उत्तर महाराष्ट्र

कामगिरीने पदाचा गौरव वाढवा : उपमुख्यमंत्री अजित पवार

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहीद तुकाराम ओंबळे यांनी दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडले. त्यांच्या कामगिरीने महाराष्ट्र पोलिस दलाचा गौरव वाढला. त्यामुळे प्रत्येकाने त्यांच्या कामगिरीतून पदाची ओळख वाढवावी. नागरिकांचे प्रश्न सोडवताना सकारात्मक द़ृष्टिकोन ठेवा. प्रत्येक वेळी कायद्याचा बांबू आडवा टाकायची गरज नाही. एकता, बंधुता, सहकार्य भावनेतून काम करून जनतेची सेवा करा, असे मार्गदर्शन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
महाराष्ट्र पोलिस अकादमीत 119 व्या प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकपदाच्या तुकडीच्या संचलन समारोहाप्रसंगी ना. पवार बोलत होते. यंदाची मानाची रिव्हॉल्व्हर गणेश चव्हाण यांना मिळाली. याप्रसंगी व्यासपीठावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ, अपर पोलिस महासंचालक प्रशिक्षणाचे संजय पवार, महाराष्ट्र पोलिस अकादमीचे संचालक राजेश कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

ना. पवार म्हणाले, पदाच्या जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी संघभावना यश देते. तुम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून नागरिकांमध्ये वावरत असतात. त्यामुळे तुमची सेवा ठळकपणे दिसणार आहे. जनतेचे प्रश्न कसे सोडवतात, नागरिकांना न्याय कसे देतात, यावरच शासनाची प्रतिमा तयार होते. तुम्हाला नागरिकांचे प्रश्न किरकोळ वाटतील. मात्र, त्यांच्यासाठी ते गंभीर असतात. त्यामुळे त्यांचे प्रश्न सकारात्मक भावनेतून सोडवावेत. पदाची ओळख कामातून होते. माणुसकी, बंधुतेची भावना घालवू नका. माणुसकी असेपर्यंतच गणवेशावरील स्टारला महत्त्व आहे. जात, पात, धर्म, पंथ, राजकीय, सामाजिक, धार्मिक विचारसरणी या गोष्टींना सार्वजनिक ठिकाणी स्थान असणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे, असा सल्लाही ना. पवार यांनी प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांना दिला.

गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी सांगितले की, स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही कठोर मेहनत घेतली आहे. पोलिस दलाला गौरवशाली इतिहास असून, तो समृद्ध करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. नोकरीच्या कालावधीमध्ये अनेक मोहाचे क्षण येतील. परंतु, त्याला बळी पडू नका. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणाला पाठिंबा देऊ नका. समाजातील कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही, याची दखल आपण संवेदनशीलतेने घेतली पाहिजे. तुमच्या सकारात्मक वर्तणुकीमुळे जनसामान्यांच्या मनामध्ये आदरभाव वाढेल. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या जगतात आपल्यालाही अपडेट राहावे लागणार आहे, असेही ते म्हणाले.

निधीची कमतरता पडणार नाही
महाराष्ट्र पोलिस अकादमीत प्रशिक्षणासाठी स्वतंत्र इमारतीची गरज असून, त्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली. त्यावेळी पवार यांनी अकादमीच्या विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही, त्याचप्रमाणे इतरही गरज असल्यास तीदेखील पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

असे आहेत मानकरी
उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी मानाच्या रिव्हॉल्व्हरचे मानकरी- गणेश वसंत चव्हाण (मोहोळ, जि. सोलापूर), अहिल्याबाई होळकर चषक विजेते व उत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी – तेजश्री गौतम म्हैसाळे (मिरज, सांगली), उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी द्वितीय – विशाल एकनाथ मिंढे, उत्कृष्ट सिल्व्हर बॅटेन पुरस्कार – प्रतापसिंग नारायण डोंगरे यांना मान्यवरांच्या हस्ते मानपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले.

मी शेतकरी कुटुंबातील असून, सोलापूर जिल्ह्यातून आलो आहे. अकादमीत आल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी होण्याचे ठरवले होते. त्यासाठी जिद्द, मेहनत घेतली. याआधी 2009 मध्ये पोलिस दलात सहभागी झालो होतो. दोन वर्षे राज्य राखीव दलात व त्यानंतर 2011 पासून फोर्स वनमध्ये सेवा बजावली. 2017 च्या खातेअंतर्गत परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
– गणेश चव्हाण, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी

बी. कॉम झाल्यानंतर मी पिंपरी-चिंचवड येथे पोलिस दलात 11 वर्षे सेवा बजावली. 2017 मध्ये खातेअंतर्गत परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश आले. त्यानंतर प्रशिक्षण घेतले. आता पुन्हा पिंपरी-चिंचवड येथे सेवा बजावण्याची संधी मिळाली आहे.
– तेजश्री गौतम म्हैसाळे,
अहिल्याबाई होळकर कप विजेत्या

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT