परशुराम घाट आजपासून सहा तास बंद | पुढारी

परशुराम घाट आजपासून सहा तास बंद

चिपळूण ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्ग अंतर्गत परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम मार्गी लावण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक महिनाभर पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. दि. 25 एप्रिल ते 25 मे अशी तब्बल एक महिना ही वाहतूक आंबडस, चिरणी मार्गे वळविण्यात येणार आहे. महामार्ग सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत परशुराम घाटादरम्यान वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यायी मार्गाने हलकी चारचाकी व दुचाकींना वाहतुकीस परवाना देण्यात येणार आहे. अवजड वाहतूक मुंबई-पुणे मार्गे कराड रस्त्यावरून वळविण्यात आली आहे.

जमिनीच्या मोबदल्याच्या वादातून परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम गेली तीन वर्षे रखडले होते. दोन महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने केलेल्या हस्तक्षेपानंतर न्यायालयाने हे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश संबंधित ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिले. यानंतर या कामाला सुरुवात झाली.

मात्र, आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर भविष्यातील धोका लक्षात घेऊन एक महिना परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवून युद्ध पातळीवर काम करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत परशुराम घाट वाहतुकीस बंदचा आदेश काढला आहे. त्याची अंमलबजावणी सोमवार दि. 25 एप्रिलपासून होणार आहे. याचा परिणाम लोटे औद्योगिक वसाहत आणि एसटी तसेच मुंबई-गोवा महामार्गावरून वाहतूक करणार्‍या अवजड वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात होणार आहे.

परशुराम घाट यामधील पंधरा ते अठरा मीटर उंचीपर्यंत खोदाईचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. या शिवाय येथे बांधकाम करणे आवश्यक आहे. घाटामध्ये मातीकाम, खोदाई काम करण्यासाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, दुर्घटना होऊ नये या हेतूने घाटातील वाहतूक बंद करण्यात येत आहे.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

महामार्ग बंदच्या काळात चारचाकी हलक्या वाहनांना पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. महामार्गावरील कमी वजनाची वाहतूक आंबडस, चिरणी, लोटे तर चिपळूणकडून येताना कळंबस्ते, आंबडस, धामणंद या मार्गाने जाणार आहे. अवजड वाहतूक मुंबई-पुणे मार्गे कराड रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभाग, लोटे औद्योगिक वसाहत, एसटी महामंडळ व अन्य खात्यांना कल्पना देण्यात आली आहे.

पर्यायी मार्गावर खबरदारी

पर्यायी मार्गावर कॅट आईज रिफ्लेक्टर, रंबल स्ट्रीप गतीरोधक, वाहतुकीची चिन्हे लावण्यात आली आहेत. रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्यात आले असून ठिकठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत. पोलिस बंदोबस्त देखील ठिकठिकाणी ठेवण्यात येणार आहे. तसेच पोलिस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. पर्यायी मार्गाने फक्‍त हलक्या वाहनांनाच परवानगी आहे. वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी पोलिसांची नेमणूक करण्यात आली असून चिरणी व आंबडस रस्त्यावर साईडपट्टी तयार करण्यात आली आहे. आवश्यक त्या ठिकाणी डागडुजी करण्यात आली असून वाहनचालकांची गैरसोय होणार नाही यासाठी अधिकारी उपस्थित असणार आहेत.

एसटीसाठी समांतर पर्यायी मार्ग खुला करण्याची मागणी

परशुराम घाट यातील चौपदरीकरणाच्या कामासाठी नुकतीच सुरू झालेली एसटीची वाहतूक सहा तास ठप्प होणार आहे. मंडणगड, खेड, दापोलीसहीत दक्षिण रत्नागिरी, या बरोबरच सिंधुदुर्ग, मुंबई, रायगड आणि पश्‍चिम महाराष्ट्रातून येणार्‍या एसटी वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होणार आहे. महामार्ग एसटीसाठी पाच तास बंद राहणार आहे. लोटे एमआयडीसीतील कंपन्यांनी लाईटवेट वाहनांची व्यवस्था केली आहे. प्रशासनाने एसटीसाठी खोपी फाटा मार्गे कळंबस्ते फाटा असा महामार्गाला समांतर असणार्‍या पर्यायी मार्ग एसटीसाठी खुला करून द्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Back to top button