Home loan : वाढते व्याजदर आणि गृहकर्ज

Home loan : वाढते व्याजदर आणि गृहकर्ज
Published on
Updated on

गेल्या काही महिन्यांपासून महागाई वाढत चालली आहे. अशी स्थितीत व्याजदरात बदल होण्याची शक्यता असते. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून आरबीआयकडून कर्जाचे आणि मुदत ठेवीचे व्याजदर नीचांकी पातळीवर ठेवण्यात आले आहेत. बँकांकडून देण्यात येणारे गृहकर्ज (Home loan) हे रेपोरेटच्या आधारावर निश्‍चित केले जाते. कोरोना काळाच्या प्रारंभापासूनच रेपोरेट स्थिर ठेवला आहे. पण महागाई अशीच वाढत राहिली तरी व्याजदरात पुन्हा वाढ होऊ शकते. अशा वेळी जून महिन्यात पतधोरण आढावा बैठकीत त्याचा फेरआढावा घेतला जाऊ शकतो.

रेपोरेटमध्ये बदल झाल्यास बँकेच्या गृहकर्जाचे व्याजदरदेखील बदलतील. उदा. यावर्षी रेपोरेट हा 4 टक्क्यांवरून 4.25 टक्के झाल्यास गृहकर्जाच्या व्याजदरात एवढ्याच मार्जीनने व्याज वाढेल.

मे 2020 पासून नीचांकी पातळीवर रेपोरेट

गृहकर्जाच्या (Home loan) व्याजदरात बदल झाल्यास, हप्त्याचा कालावधी आपोआपच वाढेल किंवा हप्त्याची रक्‍कम वाढेल. उदा. आपण 7.5 टक्के दराने गृहकर्ज घेतले असेल, तर 15 वर्षांसाठी 50 लाखांचे कर्ज फेडायचे असेल, तर अशा वेळी आपला मासिक हप्‍ता हा 46.351 रुपये असेल. व्याजदर 7.75 टक्के असेल, तर हप्‍ता 47.063 रुपये होईल. यानुसार व्याजदर वाढल्याने कर्जाच्या शेवटी आपल्याला व्याजाच्या रूपातून 1.28 लाख रुपये जादा भरावे लागतील.

कमी व्याजदरावर पुन्हा करा फायनान्स

उत्पन्‍न, क्रेडिट स्कोअर आणि चांगले कर्ज मिळण्यासाठी चांगल्या गृहकर्जाचा शोध घेतला पाहिजे. डझनभर बँका किंवा एनबीएफसी कंपन्या सध्या 6.95 टक्के दराने कर्ज देत आहेत. अर्थात त्यास क्रेडिट स्कोरशी संबंधित अटी लागू असतात. म्हणजेच जेवढा अधिक चांगला स्कोअर, तेवढे कमी व्याजदर. अशा वेळी आपला क्रेडिट स्कोअर चांगला असेल, तर आपण व्याजदर कमी करण्यासाठी बँकेशी वाटाघाटी करू शकता किंवा अन्य बँकेत कर्ज शिफ्ट करू शकता.

हप्‍ता वाढवा

काळानुसार आपले उत्पन्‍न वाढते. त्यामुळे वेतन किंवा अन्य मार्गाने येणारे उत्पन्‍न वाढले, तर त्याचा उपयोग हप्‍ता वाढवण्यासाठी करावा. जेणेकरून वाढत्या व्याजदरामुळे बसणारा आर्थिक फटका हा काही प्रमाणात कमी होऊ शकेल. हप्‍ता नियमित भरत असाल, तर बँकेकडून हप्त्यात बदल करण्याची सुविधा दिली जाते. तसेच कर्ज देणारी बँक बदलली, तर हप्‍ता कमी जास्त करण्याची सुविधादेखील मिळते. आपण कमी व्याजदरावरची बँक निवडली, तर आपला हप्‍ता कमी होईल; परंतु हप्‍ता कायम ठेवला आणि अतिरिक्‍त रक्‍कम कर्जात भरली, तर ती रक्‍कम मुद्दलात जमा होईल. उदा. आपण हप्त्याची रक्‍कम 46,351 वरून 48,668 केली तर कर्जाचा कालावधी 186 वरून 170 होईल.

एकरकमी प्री-पेमेंट करा

आपण हप्त्याची रक्‍कम बदलू इच्छित नसाल, तर वेळोवेळी एकरकमी प्री-पेमेंट करू शकता. आपण प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला कर्जाचे पाच टक्के प्री-पेमेंट करू शकता. यानुसार 50 लाखांचे कर्ज असेल, तर वर्षभरात अडीच लाख रुपये भरू शकता. त्यामुळे हप्त्याचा कालावधी हा 186 वरून 97 महिन्यांवर येईल.

प्रसाद पाटील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news