उत्तर महाराष्ट्र

नाशिक : प्रभाग 17 मध्ये जातीय समीकरणासाठी पॅनलची जुळवाजुळव

गणेश सोनवणे

नाशिक : ज्ञानेश्वर वाघ ; नाशिक शहराचे प्रमुख प्रवेशव्दार असलेल्या मुंबई नाका भागासह इतरही मध्यवर्ती भागातील राजकारणाकडे नेहमीच नाशिककरांचे लक्ष लागलेले असते. कारण या भागात सर्वजातीधर्माचे लोक राहत असल्याने ही व्होट बँक खेचून आणण्यासाठी नेहमीच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागलेली असते. नव्याने निर्माण झालेल्या प्रभाग क्र. 17 साठी या भागातील राजकीय मंडळींकडून जातीय समीकरणे जुळवून आणण्याच्या दृष्टीनेच पॅनलची निर्मिती करण्यावर भर दिला जात आहे.

2017 च्या निवडणुकीसाठी प्रभाग क्र. 13 असलेला परिसर नव्याने प्रभाग क्रमांक 17 झाला आहे. चालू पंचवार्षिक निवडणुकीसाठी चा सदस्यीय प्रभागरचना होती. परंतु, प्रभाग 13 मध्ये तीन सदस्यीय रचना होती. नव्याने तयार झालेल्या प्रभागामध्ये सर्वाधिक म्हणजे जवळपास सहा ते सात हजार इतकी मुस्लीम समाजाची मते आहेत. त्या खालोखाल माळी, मराठा, जैन, गुजराथी, मारवाडी समाजाची मते आहेत. त्यामुळे मुस्लीम मते आपल्याकडे वळविण्याच्या दृष्टीनेच पॅनल तयार करण्यावर जोर दिला जात आहे. हा मतदारसंघ तसा पाहिला तर माजी आमदार वसंत गिते यांचा मानला जातो. परंतु, गेल्या दोन विधानसभा निवडणुकीपासून त्यावर भाजपने आपली पकड आमदार तथा भाजपच्या प्रदेश सरचिटणीस देवयानी फरांदे यांच्या रूपाने कायम ठेवली आहे. यामुळे भाजपमधून शिवसेनेत स्वगृही परतलेल्या माजी आमदार वसंत गिते यांच्यासमोर भाजपचे आव्हान यावेळीही कायम असेल. त्यात आमदार देवयानी फरांदे आणि वसंत गिते यांच्यातील वादही सर्वश्रृत आहे.

यामुळे या प्रभाग क्रमांक 17 मधील लढत भाजप आणि शिवसेना यांच्यात तुल्यबळ मानली जात आहे. या भागात भाजपचे तीन विद्यमान नगरसेवक आहेत. त्यापैकी माजी महापौर प्रथमेश गिते यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. वसंत गिते यांनी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांचे चिरंजीव हेदेखील शिवसेनेच्याच संपर्कात होते केवळ प्रवेशाची औपचारिकता बाकी होती.

भाजपमधील विद्यमान नगरसेविका सुमन भालेराव, अर्चना थोरात या यावेळीदेखील इच्छुक असून, भाजपचे शहर सरचिटणीस तथा मनपाचे स्वीकृत नगरसेवक प्रशांत जाधव हेदेखील मैदानात आहेत. शिवसेनेचे वसंत गिते यांनी भाजपला टक्कर देण्यासाठी अपक्ष नगरसेवक मुशीर सय्यद यांना हाताशी धरून त्यांचा शिवसेना प्रवेश घडवून आणला आहे. यामुळे मुशीर सय्यद यांचा मुस्लीम व्होट बँकसाठी गिते यांना फायदा करून घेता येणार आहे. त्यादृष्टीनेच पॅनलची तयारी केली जात आहे. असे असले तरी राष्ट्रवादीचे या ठिकाणी माजी नगरसेवक गुलजार कोकणीदेखील निवडणूक रिंगणात आहेत. 2012 मध्ये ते मनसेकडून निवडणूक लढवून नगरसेवक झाले होते. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. कोकणी यांच्यामुळे मत विभागणी होण्याचा शिवसेनेला धोका आहे. कारण कोकणी आणि मुशीर सय्यद यांच्यामध्ये तगडी फाइट होऊ शकते.

असा आहे प्रभाग
भाभानगर, शिंगाडा तलाव परिसर, गायकवाडनगर, तिडके कॉलनी परिसर, मातोश्रीनगर परिसर, सहवासनगर परिसर, गोल्फ क्लब मैदान, मिलिंदनगर परिसर, पाटील प्रेस्टिज परिसर.

इच्छुक उमेदवार
प्रथमेश गिते, प्रशांत जाधव, गुलजार कोकणी, सुमन भालेराव, मुशिर सय्यद , अर्चना थोरात.

प्रभाग रस्त्यांची कामे बर्‍यापैकी झाली आहेत. स्वच्छतेसंदर्भात लक्ष देण्याची गरज आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने नव्याने जलकुंभाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचबरोबर ड्रेनेजची कामे झाल्याने डासांचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.
– सचिन वाघ, रहिवासी

प्रभागातील मुला-मुलींना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरिता अद्ययावत अशा लायब—रीची गरज आहे. त्यानुसार लायब—री झाली पाहिजे. साहिल लॉन्स ते साई प्रीतम या दरम्यान नवीन ड्रेनेज लाइन टाकण्यात आल्याने उघड्या गटारांचा प्रश्न सुटला आहे.
– सुभान शेख, रहिवासी

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT