उत्तर महाराष्ट्र

नाशिक वनराईमध्ये फुलणार बहुगुणी कमळांची बाग ; ‘आपलं पर्यावरण’ चा उपक्रम

गणेश सोनवणे

नाशिक : नितीन रणशूर : देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने देशभरात 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशाच्या निसर्ग मानचिन्हांपैकी एक आणि राष्ट्रीय फुलाचा दर्जा प्राप्त असलेल्या कमळाची लागवड करण्याचा उपक्रम 'आपलं पर्यावरण' या संस्थेने हाती घेतला आहे. त्याअंतर्गत म्हसरूळ येथील नाशिक वनराईमध्ये 75 कमळ कुंडे उभारून त्यामध्ये 75 वेगवेगळ्या प्रजातीच्या कमळ पुष्पांची लागवड केली जाणार आहे. त्या माध्यमातून बहुगुणी अशा कमळ पुष्पांची बाग फुलविण्यात येणार आहे.

कमळ पुष्प हे जगभरात सर्वात सुंदर फूल म्हणून ओळखले जाते. कमळ वनस्पतीमध्ये आयुर्वेदानुसार खूप काही औषधी गुणधर्म असतात. वेगवेगळ्या विकारांवर त्याचा उपयोग होतो. सौंदर्यप्रसाधनामध्येही कमळाचा वापर केला जातो. कमळ फुलाविषयी जनप्रबोधन होऊन त्याचा नैसर्गिक अधिवास टिकून राहण्यासाठी तसेच त्याचे वनस्पती म्हणून महत्त्व समजण्यासाठी बाग बनविण्याचा संकल्प 'आपलं पर्यावरण' संस्थेने केला आहे. या बागेच्या संगोपनाची जबाबदारीही संस्था घेणार आहे.

कमळ बाग लोकसहभागातून फुलविण्यात येणार आहे. त्याचे काम सुरूही झाले आहे. नाशिककरांनी या उपक्रमामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन देणगी स्वरूपात एक कमळ कुंड कायमस्वरूपी दत्तक घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दत्तक घेतलेल्या कमळ कुंडावर संबंधित पालकाचे नाव किंवा त्यांच्या संस्था-फर्मचे नावदेखील अगदी ठळकपणे लिहिण्यात येणार असल्याचे 'आपलं पर्यावरण' संस्थेने स्पष्ट केले.

कमळ ही बहुपयोगी वनस्पती आहे. नागरिकांमध्ये कमळ शेती करण्याबाबत प्रबोधन व्हावे तसेच कमळ शेतीमधून चांगल्या प्रकारे उद्योग उभे राहून लोकांकरता उपजीविका साधन निर्माण करण्यासाठी कमळ बाग फुलविण्यात येणार आहे. या कमळबागेचे उद्घाटन 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिनी केले जाणार आहे.
– शेखर गायकवाड, 'आपलं पर्यावरण' संस्था

75 कुंडांची निर्मिती
नाशिक वनराईमध्ये कमळ बाग फुलविण्यासाठी 75 कुंडांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी सिमेंटच्या तयार पाइपचा आधार घेण्यात येत आहे. कुंड उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. कुंड निर्मितीनंतर
75 प्रजातींच्या कमळांची लागवड केली जाणार आहे.

हेही वाचा :

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

SCROLL FOR NEXT