उत्तर महाराष्ट्र

नाशिक : घरपट्टी न भरणार्‍या 177 जणांचे नळ कनेक्शन कट ; महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयाची कारवाई

गणेश सोनवणे

सातपूर : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयाने घरपट्टी थकबाकी असलेल्यांवर कारवाई करीत मिळकतधारकांना वसुलीसाठी जप्तीच्या नोटिसा बजावण्याचे काम सुरू केले. वसुलीसाठी 177 नळजोडण्या खंडित केल्या आहेत. फेब्रुवारीपासून थबाकीदारांचे गाळे सील करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय अधिकारी नितीन नेर यांनी दिली.

सातपूरला 58 हजार 97 मिळकती असून, त्यांच्याकडे थकीत घरपट्टीपोटी मागील थकबाकी 27 कोटी 89 लाख व चालू मागणी 14 कोटी 14 लाख अशी एकूण 41 कोटी 95 लाख रुपये थकबाकी आहे. तसेच विभागात 29 हजार 940 नळ कनेक्शनधारक असून, त्यांच्याकडे 14 कोटी 30 लाख रुपये थकीत आहे. चालू वर्षांची 14 कोटी 62 लाख रुपये आहे. सातपूर कार्यालयाने 25 हजार रुपयांच्या पुढे थकबाकी असणार्‍यांची नळजोडणी खंडित करण्यास सुरुवात केली असून, आतापर्यंत 177 नळजोडण्या खंडित केल्या आहेत.

सातपूर विभागात मनपाचे 494 गाळे, ओटे असून त्यांच्याकडे मागील थकबाकी 4 कोटी 1 लाख रुपये व चालू थकबाकी 1 कोटी 61 लाख आहे. थकबाकी वसुलीसाठी सातपूर विभागीय कार्यालयाच्या वतीने धडक वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. जागा लायसन्स फी व इतर कर न भरणार्‍या गाळेधारकांचे गाळे सील करण्याची मोहीम फेब्रुवारीत सुरू करण्यात येणार आहे. मिळकतधारकांनी कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन आवाहन विभागीय अधिकारी नितिन नेर यांनी केले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT