चार वर्षांची मुलगी सांगते पूर्वजन्मीच्या आठवणी, मृत उषाचा नऊ वर्षांनी झाला पुनर्जन्म? - पुढारी

चार वर्षांची मुलगी सांगते पूर्वजन्मीच्या आठवणी, मृत उषाचा नऊ वर्षांनी झाला पुनर्जन्म?

उदयपूर :    

राजस्थानमधील राजसमंद येथील चार वर्षांची मुलगी आपल्या पूर्वजन्माबाबत दावे करीत असून ते थक्क करणारे आहेत. पूर्वजन्मात आपला मृत्यू कधी व कसा झाला हे ती सांगते. नऊ वर्षांपूर्वी आपला भाजून मृत्यू झाला होता, असे तिने म्हटले असून पूर्वजन्मी आपले नाव उषा असल्याचेही ती सांगते. तिच्या दाव्याची पडताळणी केली असता उषा नावाच्या महिलेचा नऊ वर्षांपूर्वी भाजून मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे.

नाथद्वाराजवळील परावल गावातील रतनसिंह चुडावत यांना पाच मुली आहेत. त्यांची सर्वात लहान मुलगी किंजल चार वर्षांची असून ती गेल्या वर्षभरापासून वारंवार आपल्या भावाला भेटण्यासाठी हट्ट करीत होती. सुरुवातीला त्यांनी तिकडे दुर्लक्ष केले, मात्र दोन महिन्यांपूर्वी किंजलची आई दुर्गा यांनी तिला ‘पापा को बुलाओ’ असे म्हटल्यावर तिने ‘पापा पिपलांत्री गाँव में है’, असे उत्तर दिले! किंजलच्या  गावापासून सुमारे तीस किलोमीटरवर हे गाव आहे. आईने वारंवार खोदून विचारल्यावर तिने सांगितले की आपले आई-वडील आणि भाऊ-बहिणींसह सर्व कुटुंब पिपलांत्री गावात राहते. आपलेे पूर्वीचे नाव उषा असून नऊ वर्षांपूर्वी आपला भाजून मृत्यू झाला होता. दुर्गा यांनी हे सर्व पती रतनसिंह यांना सांगितल्यावर त्यांनी तिला डॉक्टरांना दाखवले.

तिला कोणतीही समस्या नसून ती सामान्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, ती वारंवार पूर्वजन्मीच्या आठवणी सांगत असे. आपले वडील ट्रॅक्टर चालवतात आणि सासर ओडन येथे असल्याचेही तिने सांगितले. अखेर ही कहाणी पिपलांत्रीमधील उषा यांच्या माहेरच्या कुटुंबापर्यंतही पोहोचली. उषा यांचा भाऊ पंकज किंजलला भेटण्यासाठी परावल येथे आला. त्याला पाहताच किंजल अतिशय आनंदित झाली. सेलफोनमध्ये आई आणि उषा यांचे फोटो पाहिल्यावर ती रडू लागली. 14 जानेवारीला किंजल आपल्या कुटुंबीयांसमवेत पिपलांत्री येथे गेली. तिथे ती अनेक वर्षांपासून राहत असल्यासारखे वागत होती व परिचित महिलांशी बोलत होती. तिला आवडणार्‍या फुलांचे झाड कुठे आहे असेही तिने आईला विचारले. त्यावेळी सात-आठ वर्षांपूर्वी ते काढल्याचे त्यांनी सांगितले. भावा-बहिणींना भेटूनही ती अतिशय आनंदित झाली. उषा यांची आई गीता पालीवाल यांनी सांगितले की 2013 मध्ये स्वयंपाक करीत असताना आग लागून उषा यांचा मृत्यू झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. आता किंजल दोन्ही कुटुंबातील कन्या बनली आहे!

Back to top button