उत्तर महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणूकीचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरण्यास परवानगी

गणेश सोनवणे

धुळे : पुढारी वृत्तसेवा

ग्रामपंचायत निवडणूकीत सदस्य आणि सरपंच पदासाठी आता उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्याची परवानगी राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यानुसार उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील सर्व चार ग्रामपंचायतीच्या तहसीलदारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे उमेदवारी अर्ज दोन डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत भरता येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या एकूण 128 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम राबवला जातो आहे. यासाठी संगणक प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात संगणक प्रणालीचा वापर करून नामनिर्देशन पत्र भरण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार निवडणुकीचे काम केले जाते आहे. मात्र या निवडणूक प्रक्रियेतून कोणताही इच्छुक उमेदवार वंचित राहू नये तसेच त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळावी म्हणून राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र पारंपारिक पद्धतीने म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने स्वीकारण्याची परवानगी दिली आहे. या संदर्भातील आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून त्यानुसार धुळ्याच्या उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील चारही तहसीलदारांना ऑफलाइन पद्धतीने नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचे सूचना दिल्या आहेत.

नामनिर्देशन पत्र व घोषणा पत्राचे नमुने उमेदवारांना स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्याचे या आदेशात नमूद केले आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी सदस्य आणि थेट सरपंच पदासाठी दोन डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात आला आहे. तसेच या निवडणुकीसाठी पारंपारिक पद्धतीने स्वीकारलेले नामनिर्देशन पत्र छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवळ वैध नामनिर्देशन पत्र संगणक चालकाच्या मदतीने संगणक प्रणालीमध्ये आरओ लॉगिग मधून भरून घेण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित तहसीलदार यांच्यावर राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT