वेल्हे-हवेलीत गोवर लशीपासून बालके वंचित | पुढारी

वेल्हे-हवेलीत गोवर लशीपासून बालके वंचित

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : मुंबईपाठोपाठ पुणे जिल्ह्यात गोवरची लागण सुरू झाल्याने खडबडून जाग आलेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दुर्गम डोंगरी भागासह वेल्हे, तसेच हवेली तालुक्यात गोवर शोधमोहीम सुरू केली आहे. सिंहगड भागात गोवरसह कोणत्याही लशीचा डोस न घेतलेले चार वर्षांचे बालक सापडले.

सिंहगड-पश्चिम हवेलीत 9 व्या महिन्यांत पहिला डोस घेतलेल्यानंतर दीड वर्षाच्या वयात गोवरचा दुसरा बूस्टर डोस न घेतलेल्या बालकांची संख्या अधिक असल्याचे आरोग्य विभागाच्या शोधमोहिमेत पुढे आले आहे. बुधवारी (दि. 30) पानशेत रस्त्यावरील खानापूर (ता. हवेली) येथे आदिवासी मेळाव्यात आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत गोवर लसीकरणापासून आदिवासी कातकरी समाजाची बालके वंचित असल्याचे गंभीर चित्र पुढे आले. या सर्व बालकांना खानापूर आरोग्य केंद्राच्या पथकाने मेळाव्यातच गोवर प्रतिबंधक बूस्टर
डोस दिला.

खानापूर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वागत रिंढे, आरोग्य सहायक विजय मते, परिचारिका नीता मुसळे यांच्यासह आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचार्‍यांच्या पथकाने गोवर प्रतिबंधक लस न घेतलेल्या बालकांची शोधमोहीम सुरू केली आहे.
सिंहगड किल्ल्याच्या डोंगरदर्‍यासह खामगाव मावळ,आंबी, वरपेवाडी,सोनापूर, डोणजे आदी ठिकाणी घरोघरी जाऊन लस न घेतलेल्या बालकांची तपासणी केली जात आहे. एकाच दिवशी खानापूर केंद्रात 26 बालकांना गोवर प्रतिबंधक लस टोचण्यात आली.

वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम पानशेत, वरसगाव धरण खोर्‍यासह राजगड तोरणा, रायगड जिल्ह्यलगतच्या भागात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. वेल्हे तालुका पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. अंबादास देवकर म्हणाले, की पहिला व दुसरा बूस्टर डोस न घेतलेल्या बालकांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी गावोगावच्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, तसेच आरोग्य कर्मचार्‍यांची पथके सज्ज करण्यात आली आहेत.

परजिल्ह्यातील मजूर आणि परप्रांतीयांची संख्या अधिक
वेल्हे तालुक्यात आदिवासी कातकरी समाजाची लोकसंख्या जवळपास चार हजारांवर आहे. तसेच, तालुक्यात डोंगर माथ्यावरील वाड्यावस्त्या आहेत. या भागात बालकांना नियमित लस मिळत नाही. 9 व्या महिन्यांत पहिला व दीड वर्षात दुसरा बूस्टर डोस देणे गरजेचे आहे. मात्र, अनेक बालकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. सिंहगड-पानशेत भागात मजुरीसाठी परजिल्हे, परप्रांतातून आलेल्या बालकांना कोणताही रोग प्रतिबंधक लस दिली नसल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे.

सध्या गोवरसदृश आजाराचे बालके आढळली नाहीत. ताप असलेल्या बालकांची तपासणी केली जात आहे.
                                    डॉ. परमेर्श्वर हिरास, अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, वेल्हे

Back to top button