सुरत ते रायपूर असा रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवासी बॅगेतून पाच लाख 63 हजार रूपयांची चोरी केल्याचे प्रकार उघडकीस आला होता. या गुन्ह्याचा छडा रेल्वे पाेलिसांनी २४ तासांमध्ये लावला. सुरत येथील सराईत चाेरट्याला मुद्देमालासह अटक केली आहे.
२१ नाेव्हेंबर राेजी अहमदाबाद-पुरी एक्सप्रेसने गीताबेन योगेश पटेल (वय 38) या प्रवास करीत होत्या. त्यांनी सर्व ऐवज पर्समध्ये ठेवले. ती पर्स डाेक्याखाली ठेवून त्या झाेपल्या. जळगाव ते भुसावळ दरम्यान पहाटे चोरट्याने त्यांच्या डोक्याखाली ठेवलेली पर्स चोरून नेली. या पर्समध्ये सोन्याचे मंगळसूत्र, हार, २ चैन, एक रिंग, अंगठी, मोबाईल आणि रोख १ हजार असा ५ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल होता.
गीताबेन यांनी बडनेरा रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला . भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी लागलीच तपासचक्रे फिरवीत भुसावळ रेल्वे स्थानकावर या गाडीतून उतरलेल्या प्रवाशांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले.
एक दिव्यांग व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना दिसून आला. तो ज्या रिक्षाने गेला त्या चालकाची माहिती पोलिसांनी घेतली. सराईत चाेरटा भुसावळात कन्हैया कुंज हॉटेलमध्ये थांबला असल्याचे समजले. पाेलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. साबीर लंगडा असे त्याचे नाव असून तो सुरतचा रहिवाशी आहे. त्याने चोरलेला ५ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल पाेलिसांनी हस्तगत केला आहे.
अवघ्या २४ तासात गुन्हा उघड करण्याची कामगिरी भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय येरडे, राधाकृष्ण मीना, गुप्त वार्ता विभागाचे निरीक्षक सुरेश थोरात, उपनिरीक्षक संजय साळुंखे, हवालदार ठाकूर, घुले, खंदारे, आरपीएफचे भूषण पाटील, कैलास बोडके यांच्या पथकाने पार पाडली आहे. औरंगाबादच्या लोहमार्ग पोलीस विभागाच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी या पथकाला या कामगिरीबद्दल ५ हजार रुपयांचे बक्षीस दिले आहे.