उत्तर महाराष्ट्र

अधिवेशन संपण्याआधी शेतकऱ्यांना मदतीचा हात देणार : कृषिमंत्री अब्दुल सत्तार

गणेश सोनवणे

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

अवकाळी गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या व्यथा अन् भावना सरकार जाणून आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची भरपाई मिळावी यासाठी मी तुमच्यापर्यंत आलो असून, अधिवेशन संपायच्या आत शेतकऱ्यांना सरकारतर्फे मदतीचा हात नक्कीच दिला जाईल, असे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले.

चांदवड तालुक्यातील पन्हाळे गावात गारपिटीने उद्ध्वस्त झालेल्या पिकांच्या पाहणीसाठी आले असता शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. रात्री नऊ वाजता मंत्रिमहोदय गावात पोहोचले. त्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. मदतीपासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी बाकी राहता कामा नये. यासाठी अधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ आणि वास्तव पंचनामे करण्याच्या स्पष्ट सूचना सत्तार यांनी सोबत असलेल्या अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी सूर्यभान वाघ या शेतकऱ्याने मंत्र्यांपुढे कैफियत मांडली. पुढील वर्षीच्या खरीप हंगामासाठी सरकारने मोफत कांदा बियाणे पुरवावे. तसेच तत्काळ मदत घोषित करावी. जिल्हा बँकेच्या ठेवीमधून कर्ज रक्कम भरणा करावी. उर्वरित ठेवी शेतकऱ्यांना तत्काळ मिळाव्यात आदी मागण्या केल्या. विजय कुंभार्डे यांनी मागील वर्षीचे अतिवृष्टीचे अनुदान अजून मिळाले नाही, याकडे लक्ष वेधले.

कांदा अनुदान तीन महीन्यांसाठी द्या : डॉ. कुंभार्डे

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी सरकारने कांद्याला 350 रुपये अनुदान जाहीर केले. यासाठी सरकारने निर्णय घेताना जानेवारी ते मार्च या तीनही महिन्यांचा समावेश करावा, अशी मागणी केली.

यावेळी तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, डॉ. नितीन गांगुर्डे, सरपंच कविता ठाकरे, सरपंच उत्तम झाल्टे, सरपंच बाबूराव कुंभार्डे, उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार प्रदीप पाटील, गटविकास अधिकारी महेश पाटील, कृषी अधिकारी विलास सोनवणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT