उत्तर महाराष्ट्र

एकनाथ खडसेंचा शहर पोलीस ठाण्यात ठिय्या; जिल्हा दूध संघातील गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

backup backup

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा दूध संघात लोणी व दूध पावडरच्या विक्रीत १ कोटी १५ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधितांविरुध्द गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आ. खडसे यांनी गुरूवारी (दि. १३) जळगाव शहर पोलीस ठाण्यात निरीक्षकांच्या दालनात ठिय्या मांडला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत येथून हलणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत आ. खडसे पोलीस ठाण्यातच ठाण मांडून होते.

याप्रसंगी जळगाव शहर पोलीस ठाण्यात दूध संघाच्या चेअरमन मंदाताई खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा मंगला पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यावर राज्य शासनाने जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. आमदार मंगेश चव्हाण यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रभारी कार्यकारी संचालक शैलेश सुरेश मोरखडे यांची या पदावर निवड झाली होती.

बी ग्रेड तुपाची परस्पर विक्री करुन २ लाख ७ हजारांचा घोटाळा केल्याची तक्रार मोरखडे यांनी दिली होती. त्यानुसार गुन्हा देखील दाखल झाला होता. परंतु मध्यंतरीच्या काळात पुन्हा पुर्वीचे संचालक मंडळ अस्तित्वात आले.

या संचालक मंडळास लोणी व दूध पावडरची परस्पर विक्री करुन १ कोटी १५ लाख रुपयांचा अपहार केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दूध संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे व कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी बुधवारी शहर पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली. ही तक्रार करत त्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे खडसे यांनी आज शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांच्या दालनातच ठिय्या मांडला.

बी ग्रेड तुपाचे व आताचे बटर, दूध पावडरचे प्रकरण पुर्णत: वेगळे आहे. त्यामुळे याबाबतचा स्वतंत्र गुन्हा दाखल करावा म्हणून दोन दिवसापासून पोलिसांकडे पाठपुरावा करीत आहे. पोलीस आरोपींना मदत करीत आहेत. गुन्हा तर दाखल झाला नाहीच पण यातील संशयित तीघे जण शहरातून गायब झालेले आहेत. गुन्हा दाखल करून घेतला तर याबाबतच्या अधिक तपासात सगळे सत्य उघड होईल. ज्यांनी याबाबतची एक तक्रार केली होती, त्यांच्याच लोकांनी हा गैरव्यवहार केल्याचे आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

जिल्हा दूध संघात झालेल्या अपहाराबाबत गुन्हा दाखल करण्यात पोलीस कर्मचारी दिरंगाई करत आहे. यासंदर्भात खडसेंनी आक्रमक भूमिका घेत पोलीस अधिकार्‍यांना खडेबोल सुनावले. खडसे म्हणाले की, जळगाव जिल्हा दूध संघात अपहार झाला आहे. यासंदर्भात एखाद्या आमदाराला गेल्या तीन तासांपासून पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन करावे लागत आहे. कुणाच्या दबावाखाली तुम्ही काम करत आहात? असा सवाल माजी मंत्री आमदार खडसे यांनी केला आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT