नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना काळात ऑटोमोबाइल क्षेत्रावर आलेली मरगळ दसरा-दिवाळी सणामुळे दूर झाली आहे. दिवाळीचा मुहूर्त साधत ग्राहकांनी धनत्रयोदशीनिमित्त चारचाकी, दुचाकी, इलेक्ट्रिक बाइकची मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने, रात्री उशिरापर्यंत समोर आलेले विक्रीचे आकडे थक्क करणारे ठरले. अनेकांनी धनत्रयोदशीला बुकिंग अन् लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर डिलिव्हरी घेण्याचे नियोजन केल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
सध्या बाजारात चारचाकीमध्ये सर्वच कंपन्यांनी एकापेक्षा एक सरस मॉडेल आणले आहेत. ग्राहकांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन या गाड्यांमध्ये फिचर्स उपलब्ध करून दिले आहेत. विशेष म्हणजे सर्वच वयोगटाच्या दृष्टीने बहुतांश कार डिझाइन केल्याने, ग्राहकांना अनेकविध पर्याय उपलब्ध आहेत. विशेषत: एसयूव्ही कार खरेदीकडे ग्राहकांचा मोठा कल दिसून येत आहे. दुचाकी खरेदीकडेदेखील ग्राहकांचा मोठा कल दिसून आला. दुचाकीच्या डिलिव्हरीकरिताही ग्राहकांनी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त निवडल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दरम्यान, इलेक्ट्रिक दुचाकी, चारचाकी खरेदीचा पर्यायदेखील अनेक ग्राहकांनी निवडला. मात्र, या सेगमेंटमध्ये ग्राहकांची मागणी इतकी दिसून आली की, अनेक शोरूममध्ये बाइक उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे अनेकांनी दिवाळीच्या मुहूर्तावर केवळ बुकिंगलाच प्राधान्य दिले. आता लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात चारचाकी आणि दुचाकीची डिलिव्हरी देण्याचे आव्हान शोरूम चालकांसमोर असणार आहे.
इलेक्ट्रिक बाइकला ग्राहकांची पसंती…
इलेक्ट्रिक बाइक खरेदीला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, आरटीओ रजिस्ट्रेशनला विलंब लागत असल्याने, ग्राहकांना लगेचच डिलिव्हरी देणे अशक्य होत आहे. त्यामुळे ग्राहकांचा काहीसा हिरमोड होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. आरटीओ रजिस्ट्रेशनकरिता किमान पाच ते सहा दिवसांचा अवधी लागतो.
इलेक्ट्रिक बाइकला मोठ्या प्रमाणात ग्राहकांची पसंती मिळत आहे. पेट्रोल बाइकला जबरदस्त पर्याय ठरत असलेल्या या बाइक मजबूत आणि आकर्षक असल्याने, सर्वच स्तरांतील ग्राहक बाइक खरेदीला प्राधान्य देत आहेत. कॉलेज तरुण-तरुणींसह ऑफिशियल वापरासाठीही या बाइक पर्याय ठरत आहेत. दिवाळीनिमित्त इलेक्ट्रिक बाइक खरेदीकडे मोठा कल असल्याने, सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. – समकित जितेंद्र शाह, सहसंस्थापक, जितेंद्र न्यू ईव्ही टेक