सांगलीत ढगफुटीसदृश अतिवृष्टी : सर्वत्र दाणादाण | पुढारी

सांगलीत ढगफुटीसदृश अतिवृष्टी : सर्वत्र दाणादाण

सांगली;  पुढारी वृत्तसेवा :  सांगलीला शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ते शनिवारी पहाटेपर्यंत पावसाने अक्षरश: धुऊन काढले. मध्यरात्री एक ते साडेपाच या कालावधीत 89 मि.मी. पाऊस झाला. दीड ते तीन वाजेपर्यंतच्या दीड तासातच 60 मि.मी.हून अधिक पाऊस झाला. नाले ओव्हरफ्लो झाले. लगतच्या नागरी वस्तीत नाल्यांचे व पावसाचे पाणी शिरले. उपनगरांमधील अनेक मोकळ्या जागी तळी साचली. अनेक रस्ते पाण्याखाली गेले. अनेक घरात, अंगणात पाणी शिरले. संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पाण्याने तळघरे भरून गेली. तळघरातील वाहने, साहित्याचेही प्रचंड नुकसान झाले. अनेक नागरिकांनी रात्र जागून काढली.

सांगलीत शुक्रवारी मध्यरात्रीनंतर एक वाजता पावसास सुरुवात झाली. सुरुवातीला हलकासा पाऊस होता. मात्र दीड वाजता पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढला. दीड ते पावणेचार वाजेपर्यंत पाऊस जोरात होता. दीड ते तीन या वेळेत तर ढगफुटीसदृश पाऊस झाला. पावणेचार ते साडेचार वाजेपर्यंत पावसाचा जोर थोडा ओसरला. पुन्हा साडेचार ते शनिवारी पहाटे साडेपाचपर्यंत जोरात पाऊस झाला. 89.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यापैकी 60 मि.मी. हून अधिक पाऊस हा मध्यरात्री दीड ते तीन या दीड तासात झाला.

थोड्या कालावधीत जोराचा पाऊस झाल्याने पाण्याचा निचरा होण्यास उसंतच मिळाली नाही. सर्वत्र पाणीच पाणी झाले. नाले तुडुंब भरून ओव्हरफ्लो होऊन वाहत होते. काही ठिकाणी नाले तुंबल्याने साडेचारशेहून अधिक घरांमध्ये पाणी शिरले. मीरा हाऊसिंग सोसायटी ते भीमनगर नाल्याचे पाणी परिसरातील 60 हून अधिक घरांमध्ये शिरले. अनपेक्षित प्रकाराने नागरिकांची अक्षरश: तारांबळ उडाली. नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी धाव घेत कर्मचार्‍यांच्या मदतीने चर काढून साचलेल्या पाण्याला वाट करून दिली.

चैत्रबन नाल्यासाठी अनोखे आंदोलन

चैत्रबन नाला ओव्हरफ्लो होऊन वाहत नागरी वस्तीत शिरला. शेजारील अनेक घरांमध्ये नाल्याचे व पावसाचे पाणी शिरले. प्रभाग क्रमांक आठ व प्रभाग क्रमांक नऊ मधील अनेक कुटुंबांना या पाण्याचा फटका बसला. अतिवृष्टीने चैत्रबन नाल्याच्या मर्यादा उघड्या पडल्या. दहा कोटींचे आठ तुकडे न पाडता चैत्रबन नाला आयडिअल नाला म्हणून विकसित केला असता तर आजचे विदारक चित्र पहावयास मिळाले नसते. नागरिकांच्या घरात पाणी शिरले नसते, याकडे नगरसेवक संतोष पाटील, रोहिणी पाटील यांनी लक्ष वेधले. चैत्रबन नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण करून पक्के बांधकाम करावे, या मागणीसाठी नगरसेवक संतोष पाटील, शंभूराज काटकर व कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील पाण्यातच ठिय्या मारून लक्षवेधी आंदोलन केले.

मंगलमूर्ती कॉलनी, तुळजाईनगर विद्यानगर, आनंदनगर आदी ठिकाणी नाल्यालगतच्या 150 घरांमध्ये पाणी घुसले. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, नगरसेवक विष्णू माने, संतोष पाटील यांनी भेट दिली. नाल्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन सूर्यवंशी यांनी दिले. नगरसेवक मनगू सरगर, राजेंद्र कुंभार, कल्पना कोळेकर व नागरिक उपस्थित होते. तुंबलेला नाला साफ करून पाणी वाहते केले.

विश्रामबाग, स्फूर्ती चौक, हनुमाननगर, प्रगती कॉलनी, कुंटे मळा, शामरावनगरसह सांगली शहर व उपनगरे, कुपवाड परिसराला पावसाने अक्षरश: धुऊन काढले. पावसाच्या पाण्याचा वाहणारा मोठा प्रवाह, तुंबलेल्या गटारी यामुळे अनेक घरांत पाणी शिरले. नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. नागरिकांनी रात्र जागून काढली. नगरसेवक विनायक सिंहासने, संजय कुलकर्णी यांनी जेसीबी व महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांना पाचारण करून स्फूर्ती चौकात तुंबलेल्या पाण्याला वाट करून दिली.

शामरावनगर, हनुमाननगर आदी भागांत यापूर्वीच पावसाच्या पाण्याने तळी साचली होती. त्यात या ढगफुटीसदृश पावसाने मोठी भर घातली. परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. शनिवारी दुपारपर्यंत घरातील पाणी ओसरले होते. मात्र, अंगणात पाणी होते. नगरसेवक व कार्यकर्त्यांनी महापालिका कर्मचार्‍यांच्या मदतीने नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

महापौर, आयुक्त, नगरसेवक धावले

महापालिकेचे दीडशे अधिकारी, कर्मचारी शनिवारी पहाटेपासून ते सायंकाळपर्यंत कार्यरत होते. नागरी वस्तीत शिरलेले पाणी बाहेर काढत होते. महापौर दिग्विजय सूर्यवंशी व त्या-त्या भागातील नगरसेवक रात्री दोन वाजल्यापासून सर्वत्र फिरून परिस्थितीची माहिती घेत होते. आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे हेही पाहणी करून अधिकारी व स्वच्छता विभागाच्या कर्मचार्‍यांना उपाययोजनांबाबत सूचना देत होते. नगरसेवक लक्ष्मण नवलाई उपस्थित होते. महापालिकेचे सहा जेसीबी, शंभर ते दीडशे कर्मचारी पहाटेपासून शनिवारी सायंकाळपर्यंत नागरी वस्तीत शिरलेले पाणी चर काढून बाहेर काढत होते. पाण्याला वाट करून देत होते. आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे नेते शेखर इनामदार, काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांनीही पाहणी करून अधिकार्‍यांना सूचना केल्या.

गटारीचे चेंबर बंद; दीड फूट पाणी साचले

शंभरफुटी रस्त्यावरील धामणी चौकात भोबे गटारीचे चेंबर कोणीतरी बंद केलेले होते. त्याचा मोठा फटका बसला. मोठ्या गटारीचे चेंबरच बंद असल्याने दीडफूट पाणी थांबले होते. प्रगती कॉलनी, कुंटेमळा व परिसरात पाणी साचून राहिले. हा प्रकार लक्षात येताच चेंबर उघडून पाण्याचा मार्ग मोकळा केला. शनिवारी सकाळी 6 वाजता हे पाणी ओसरले. भोबे गटारीच्या शेवटच्या टोकाला घाण साचली होती. त्यामुळे गारपीर चौकापासून पाणी पसरले. अनेक घरांत पाणी घुसले. कमी कालावधीत प्रचंड पाऊस आणि तुंबलेले नाले याचा परिणाम म्हणून पावसाचे पाणी नागरी वस्तीत घुसले. संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक तळघरांमध्ये पाणी शिरले.

स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट तातडीने : गाडगीळ

आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसाने महापालिका क्षेत्रात अनेक घरात पाणी शिरले. नागरिक, व्यावसायिकांचे नुकसान झाले. रस्त्यावरून पाणी वहात होते. एकूणच हा सर्व प्रकार पाहता महापालिका क्षेत्रासाठी स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंटचा प्रस्ताव तातडीने तयार करण्यास शेखर इनामदार यांना सांगितले आहे. या प्रस्ताव शासनाकडून प्राधान्याने मंजूर करून आणला जाईल.

नालेसफाईचे ऑडिट : महापौर सूर्यवंशी

महापौर दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले, नाले सफाईचे ऑडिट व्हायला पाहिजे. नाल्यातील गाळ काढून जवळच रचला जातो. तोच गाळ पुन्हा नाल्यात पडतो. अनेक नाल्यांवर अतिक्रमण झालेले आहे. काही ठिकाणी पाईप घालून नाला अरुंद केलेला आहे. नाल्यांवरील अतिक्रमण काढून ते खोल, रुंद केले पाहिजेत. नाल्याचे पक्के बांधकाम केले पाहिजे. मुजलेले नैसर्गिक नाले पूर्ववत व्हायला पाहिजेत.

Back to top button