Assault Pudhari
धुळे

Dhule crime news | आंब्याच्या रसात गुंगीचे औषध देऊन सावत्र बापाचा मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; पीडितेची पोलिसांत तक्रार

बापाविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पुढारी वृत्तसेवा

धुळे : आंब्याच्या रसात गुंगीकारक औषध टाकून सावत्र मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील एका गावातील १८ वर्ष वयाच्या पीडित मुलीने पोलिसात फिर्याद दिली आहे.

गुरुवारी सायंकाळी मुलगी घरात स्वयंपाक करत असतांना तिचा सावत्र बाप त्याठिकाणी आंब्याचा रस करत होता. यावेळी अचानक मुलीच्या पायावर आंब्याचा रस उडाल्याने तिने खाली पाहिले असता आंब्याच्या रसावर काहीतरी काळ्या रंगाचे द्रव्य तरंगत असल्याचे दिसून आले. याबाबत तिने वडिलांना विचारले तर त्याने विषय टाळून स्वयंपाकात लक्ष देण्याचा मुलीला सल्ला दिला. यादरम्यान त्याच्या हातून काहीतरी खाली पडल्याचे लक्षात येताच मुलीने त्याची नजर चुकवून ती वस्तू पाहिली. ती काळ्या रंगाची औषधी गोळी असल्याने तिने गुपचूप उचलून एका कागदात गुंडाळून लपवली.

सदर गुंगीकारक गोळी आंब्याच्या रसात मिसळून आपल्यावर बापाकडून अतिप्रसंग होईल, या भीतीने मुलीने रात्रीचे जेवण न घेता शेजारी राहणाऱ्या महिलेकडे झोपणार असल्याचे तिच्या वडिलांना सांगितले. याचा राग आल्याने त्याने त्याच्या मोबाईलमध्ये काढलेले मुलीचे झोपेतील व्हिडीओ दाखवत तिला व्हिडीओ व्हायरल करून गावात बदनामी करेल, असे सांगत ठरलेले लग्न मोडण्याची धमकी दिली.

मुलीने त्याच्या धमकीला न घाबरता रात्री शेजारी राहणाऱ्या महिलेकडे आश्रय घेतला. यानंतर तिने काल सकाळी गावाचे पोलीस पाटील यांच्या मदतीने तालुका पोलीस ठाण्यात तिचा सावत्र बाप योगेश प्रल्हाद सोनवणे (रा. वरखेडी) याच्या विरोधात फिर्याद दिली. दरम्यान संशयित योगेश सोनवणे विरोधात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT