पिंपळनेर : राज्यासह गुजरात व मध्य प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या धुळ्यातील आमळी येथील कन्हैयालाल महाराज (विष्णू भगवान) यांच्या यात्रोत्सवास रविवार (दि.२) पासून प्रारंभ होत आहे. दीपोत्सवानंतर कार्तिकी एकादशीला ही भव्य यात्रा भरते.
यात्रोत्सवाच्या निमित्ताने श्रीक्षेत्र आमळी येथे जोरदार तयारी सुरू झाली आहे. यात्रेत पाळणे आणि झुले लावण्यात येत असून मोठी हॉटेल्स, पूजा साहित्य, खेळणी आणि इतर विविध वस्तूंची दुकाने थाटून व्यावसायिक दाखल झाले आहेत. यात्रोत्सव काळात असंख्य भाविक आमळी येथे येत असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
यात्रोत्सव काळात भाविकांना सोयीचे व्हावे यासाठी मंदिर व्यवस्थापनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले राहणार आहे. तसेच, भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शनिवारपासून मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. स्थानिक नागरिक आणि व्यापारी यांना यात्रेच्या दिवशी मांसविक्री बंदीबाबत सक्त सूचना देण्यात आल्याचे पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण बर्गे यांनी सांगितले.