

28 vehicles seized Dhule
धुळे: धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा, धुळे तालुका, आणि नरडाणा पोलीस ठाण्याच्या पथकांनी नाकाबंदी दरम्यान दुचाकी चोरी करणाऱ्या टोळक्याला गजाआड केले आहे. या तीनही पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे या टोळक्याकडून 28 दुचाकी जप्त केल्या असून अटक केलेल्या आरोपींकडून आणखी चोऱ्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
धुळे जिल्ह्यात रात्री नाकाबद्दी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले होते. त्यानुसार जिल्ह्यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. यात संशयित गाड्यांची तपासणी करणे सुरू असतानाच धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे तसेच दोंडाईचा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश सोनवणे यांनी संशयितपणे जाणाऱ्या काही जणांना थांबवून विचारपूस केली असता या संशयितांकडून चोरीच्या गाड्यांचे मोठे रॅकेट उघड झाले.
या तीनही पोलीस ठाण्याच्या पथकाने स्वतंत्रपणे कारवाई करीत धुळे येथील दिलदार नगर मध्ये राहणारा सईम निहाल अहमद अन्सारी, एकता सर्कल भुला बाजार जवळ राहणारा जुनेद शा फिरोज शा फकिर, दोंडाईचा येथील विष्णू किसन वळवी, शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील तुषार अमृत खैरनार, यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुध्द गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या चौघा आरोपींकडून चोरी केलेल्या 28 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहे. या टोळक्याने धुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून तसेच नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातून देखील मोटरसायकली चोरल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. सदर आरोपीताविरुध्द इतर जिल्हयातही गुन्हे दाखल असून जप्त करण्यात आलेल्या मोटार सायकल मधुन धुळे, अमळनेर येथील दाखल गुन्हयांत हस्तांतर करण्याची कारवाई करण्यात येत आहे.