ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा ताफा धुळ्यात पोलिसांनी रोखला.  Pudhari
धुळे

Shiv Sena UBT Protest | नवनीत राणा यांच्या निवासस्थानी आंदोलनासाठी निघालेल्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना धुळ्यात पोलिसांनी रोखले

ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा ताफा धुळ्यात पोलिसांनी रोखला

पुढारी वृत्तसेवा

Shiv Sena UBT vs Navneet Rana

धुळे : भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या अमरावती येथील निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण आंदोलन करण्यासाठी निघालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा ताफा धुळ्यात पोलिसांनी रोखला. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांनी केलेल्या विनंतीनंतर शिवसैनिकांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित चोरीच्या प्रकरणावर भाजप नेत्या नवनीत राणा आणि भाजपच्या इतर नेत्यांनी मौन बाळगल्याने त्यांनी या घटनेवर भूमिका स्पष्ट करावी. या निषेधार्थ अमरावती येथे जाऊन नवनीत राणा यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आंदोलनाची सुरुवात धुळे शहरातील आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरात रामरक्षा आणि हनुमान चालीसा पठणाने झाली. त्यानंतर शिवसैनिकांनी विविध घोषणाबाजी करत अमरावतीकडे प्रस्थान केले. आंदोलनात जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, निंबा मराठे यांच्या नेतृत्वाखाली आयोजक पंकज भारस्कर, सागर निकम यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि शिवसैनिक सहभागी झाले होते.

मात्र, मनोहर चित्रमंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आझादनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद पाटील यांनी शिवसैनिकांचा ताफा अडविला. राज्यात लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आंदोलन स्थगित करण्याची विनंती पोलिसांनी केली. त्यानंतर शिवसेनेने पोलिसांच्या विनंतीला मान देत आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

यावेळी पोलिसांनी आयोजक पंकज भारस्कर आणि सागर निकम यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अंतर्गत नोटीस बजावली.

आंदोलन पुढे सुरू ठेवण्याचा इशारा

"राज्यातील सध्याची परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र, योग्य वेळी हे आंदोलन पूर्ण करण्यात येईल," अशी माहिती आयोजक पंकज भारस्कर आणि सागर निकम यांनी दिली.

या आंदोलनात पारोळा, एरंडोल, जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, मलकापूर, नांदुरा, खामगाव, अकोला, मूर्तिजापूर आणि अमरावती येथील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार होते. मात्र, पोलिसांनी ताफा मार्गातच रोखल्याने नियोजित आंदोलन पुढे होऊ शकले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT