Sakri Panjhara River Flood
पिंपळनेर : साक्री तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पांझरा आणि जामखेली नद्यांना मोठा पूर आला असून नदीकाठच्या वस्त्यांवर धोका निर्माण झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत प्रशासनाने सामोडे आणि पिंपळनेर येथील एकूण ४१ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. पूरग्रस्तांच्या निवासाची तसेच भोजनाची तातडीने व्यवस्था करण्यात आल्याने प्रशासनाने मदतकार्याला वेग दिला आहे.
प्रशासनाने सामोडे येथील इंदिरानगरमधील ५ तर पिंपळनेर येथील टेकपाडा वस्तीतील ३६ अशा एकूण ४१ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. या कुटुंबांची प्राथमिक मराठी शाळेत तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून, नवापूर रस्त्यावरील अनिरुद्ध एखंडे लॉन्स येथे सुमारे ५०० नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
अपर तहसीलदार अधिकार पेंढारकर यांनी नागरिकांना नदीकाठ, पूल आणि सखल भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच स्वतःची आणि जनावरांची सुरक्षितता जपण्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या लाटीपाडा धरणातून २२ हजार ३४४ क्युसेक, जामखेली मध्यम प्रकल्पातून २ हजार ७४५ क्युसेक आणि मालेगाव धरणातून ३ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पांझरा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्याचबरोबर गटखळ नदीलाही मोठा पूर आला आहे.
दरम्यान, जामखेली नदीच्या पुरामुळे सामोडे गावाजवळ सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामासाठी उभारण्यात आलेले लोखंडी पिंजरे आणि मातीचा भराव वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून पूरस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.