Six Accused Under MCOCA
धुळे: धुळे जिल्ह्यातील गंभीर गुन्हे करणाऱ्या आणखी एका टोळीवर मिनी मोका कायदा अन्वये कारवाई करण्यास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मंजुरी दिली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात या तिसऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आली आहे .तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या टोळ्यांवर या कलमान्वये कारवाई करण्यासाठी पावले उचलली जात आहे. यासाठी सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षक धीवरे यांनी आदेश दिले आहेत.
देवपूर परिसरात राहणारा टोळी प्रमुख नरेश कांतीलाल गवळी (यादव), व त्याच्या नेतृत्वाखालील संघटित गुन्हेगारी टोळीतील संघटनेचे सक्रीय सदस्य आकाश उमेश पानथरे, ऋषभ ऊर्फ किरण मनोहर शिरसाठ, रोहीत रविकांत सानप , भुऱ्या ऊर्फ प्रणेश अनिल काकडे, नितीन एकनाथ पाटील, यांचा देवपूर पोलीस ठाणे तसेच धुळे जिल्ह्यातील अन्य पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्हयाचे तपासात सहभाग निष्पन्न झालेला आहे.
संघटीत गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख व गुन्हेगारी संघटनेचे सदस्यांचे गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता त्यांनी संघटीत गुन्हेगारी टोळीच्यावतीने तर कधी संघटीत गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख सदस्य म्हणून वेगवेगळया सदस्यांना सोबत घेऊन मागील 10 वर्षात वेगवेगळ्या प्रकारचे 27 गंभीर गुन्हे दाखल झाले असून 17 गुन्हे हे तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेले गुन्हे आहेत. त्यापैकी 21 गुन्हयांमध्ये संबंधीत कार्यक्षेत्राच्या विद्यमान न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहेत.
टोळी प्रमुख नरेश कांतीलाल गवळी (यादव) व इतर सदस्य यांच्या गुन्हेगारी वर्तनावर नियंत्रण ठेवणे व त्यांचे समूळ उच्चाटन करण्या करीता सार्वत्रिक हिताच्या दृष्टीने निकडीचे झाले होते. याकरीता देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान महादु वाघ यांनी या गुन्हयाचा तपास करुन गुन्हयास बिएनएस कलम 111 कलमान्वये कारवाई करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, धुळे शहर उपविभाग राजकुमार उपासे यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक यांची पुर्व परवानगी घेण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता.
त्यानुसार पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी देवपूर पोलीस ठाणे अंतर्गत बिएनएस क.109, 118(2), 115(2), 189(2), 191(2), 190, 249 (2), 191(2),190, 249 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 37 (1) (3) चे उल्लंघन 135 या गुन्हयात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 111 हे वाढीव कलम (मिनी मोक्का) लागु करण्यास पुर्व परवानगी देण्यात आली आहे. संघटीतपणे गुन्हे करणाऱ्या टोळीविरुध्द मोक्का व मिनी मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याचे सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी धुळे जिल्हा यांना निर्देश देण्यात आलेले आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली राजकुमार उपासे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी केली आहे.