Manoj Jarange Patil Maratha Reservation protest Latest News
धुळे : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभेच्या खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांनी त्यांची भेट घेतली असून या मागणी संदर्भात संसदेत आवाज उठवणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
राज्यात गेली अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. यापूर्वी मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी मागणी मनोज जरांगे हे सातत्याने करीत आहेत. दोन दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याचे संकेत दिले. यापुढे कमी सांगायचे आणि कमी बोलायचे, पण आता करून दाखवायचे असे मनोज जरांगे यांनी म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी राज्यभरातून मराठा कार्यकर्ते अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले होते.
या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी धुळे लोकसभेच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या बैठकीत मराठा आरक्षणासह गेली दोन वर्षे मराठा समाजाला आंदोलन करून काय मिळालं? आणि आता काय मिळवायचं? या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.
तसेच २९ ऑगस्टच्या मुंबई आंदोलनाच्या नियोजनाबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, आगामी आंदोलन मुंबईतच होणार आहे. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, असा ठाम निर्धार यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. मुंबईतील हे आंदोलन आता फक्त मागणीचं नाही, तर निर्णय घेण्यासाठीचे असेल, असे या बैठकीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
आता ही लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. ही शेवटची लढाई मराठ्यांनी जिद्दीने आणि एकजुटीने पार पाडली पाहिजे," असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी मी संसदेत आवाज उठवणार असून होणाऱ्या आंदोलनात आम्ही आपल्या सोबत आहोत असे देखील खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी मनोज जरांगे पाटील यांना आश्वासन दिले.