

On August 29, lakhs of Maratha community people will include march in Mumbai
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मुंबईत धडक मारण्याचा निर्धार अंतरवाली सराटी येथे रविवारी (दि.. २९) झालेल्या महाबैठकीत करण्यात आला. येत्या २९ ऑगस्ट रोजी लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईत धडकणार आहे. आता गुलाल उधळूनच परतणार असल्याचा मनसुबा या वेळी आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी बोलून दाखविला.
मुंबई मोर्चाचे नियोजन करण्यासाठी बैठक झाली. बैठकीसाठी मराठवाड्यासह राज्याच्या कानाकोपर्यातून समाजबांधव जमा झाले होते. अंतरवालीकडे जाणारे सगळे रस्ते जाम झाले होते. वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. परंतु समाज फुटला नाही. २९ ला जातीसाठी समाज कसा एकत्र येतो हे कळेल, आता लढूवन विजय मिळवूनच परतावयाचे असल्याचे ते म्हणाले.
मराठा आर-क्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. ५८ लाख नोंदी सापडल्या असून, ४ कोटी मराठा समाज आरक्षणात गेला असल्याचा दावा त्यांनी केला. फक्त सात ते आठ टक्के समाज राहिला आहे. त्यासाठी आता ही आरपारची लढाई असल्याचे जरांगे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, दोन वर्षे झाले आपण लढतोय.
लाखो मराठे एकत्र आलेत, आता विजयापासून कोणी रोखू शकत नाही. ही संघर्षाची लढाई आता जिंकायची म्हणजे जिंकायची आहे. राजकीय लोक, पक्ष निवडून येण्यासाठी रात्रंदिवस मरमर करतात. पण आपल्या लेकरांसाठी, जातीसाठी कोणी तसे प्रयत्न करताना दिसत नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली.
२७ ऑगस्टला सकाळी दहा वाजता अंतरवालीतून मुंबईसाठी मराठा समाजबांधव निघणार आहेत. दोन दिवस आणि दोन रात्रीतून सलग जाऊन २९ रोजी मुंबई गाठायची आहे. अंतरवाली सराटी, शहागड, शेवगाव, अहिल्यानगर, आळा फाटा, शिवनेरी, वाशी, चेंबूर, आझाद मैदान मंत्रालय येथे पोहोचणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.