सोनगीर : जुने मीटर काढून नवे स्मार्ट मीटर लावण्याचे काम महावितरण कडून चालू आहे. ग्राहकांना पूर्व सूचना देणे त्यांचा होकार आल्यावरच मीटर बदलण्यात यावे अशी कडक सूचना महावितरणाला देण्यात आल्या आहेत. परंतु धुळे जिल्ह्यात महावितरणाचे मनमानी कारभार सुरु असल्याने ग्राहकांना कोणतीही पूर्व सूचना न देता मीटर बदलण्यात आले आहेत.
याबाबत धुळे जिल्ह्यातील रहिवासी रुपेश मराठे यांनी त्यांच्या अनुपस्थित महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्व सूचना न देता, अंतिम रीडिंग न घेता मीटर बदलण्यात आले असल्याची तक्रार महावितरणकडे केली. परंतु महावितरणकडून समाधान कारक उत्तर न मिळाल्याने प्रकरण ग्राहक आयोगाकडे गेले. आयोगात कंपनीकडून कोणीही उपस्थित न राहिल्यामुळे प्रकरण एकतर्फी चालवण्यात आले. आयोगाने स्पष्ट केले की, नियमांचे उल्लंघन करून मीटर बदलवणे ही सेवेतील त्रुटी आहे. कंपनीला याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.
या प्रकरणी महावितरणला तक्रारदाराला ८ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामध्ये आर्थिक, मानसिक आणि अर्जखर्चाचा समावेश आहे. ४५ दिवसांत रक्कम न दिल्यास ६ टक्के व्याजासह पैसे मिळण्याचे आदेशही देण्यात आले आहे. जिल्हा ग्राहक तक्रार आयोगाने अशा प्रकारे चाललेल्या मनमानी कारभारावर कडक ताशेरे ओढले आहेत. हा निर्णय सर्वसामान्य ग्राहकांसाठी मोठा विजयाचा निर्णय आहे. महावितरणच्या मनमानी कारभाराला आता लगाम बसेल अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.