धुळे : मानसिक छळ करून एकाच परिवारातील चौघांना जीवन संपविण्याकरिता भाग पाडल्याचा गुन्हा सिद्ध झाला असून यात जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी तिघांना दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. आरोपींमध्ये तत्कालीन पोलीस पाटील यांचा देखील समावेश आहे.
घटनेचा थोडक्यात वृत्तांत असा की, हि घटना नरडाणा पोलीस ठाणे हद्दीत १७ फेब्रुवारी २०१७ रोजी घडली होती. यात आसाराम भबुता भिल, मोठाभाऊ उर्फ विनोद भिल, शिवदास आसाराम भिल, यांनी भुसावळ सुरत रेल्वे मार्गावर धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन जीवन संपविले. तर विठाबाई भिल व मुलगी वैशाली यांनी विहिरित उड्या घेतल्या. यातुन सुदैवाने वैशाली भिल वाचली.पण विठाबाई यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या घटनेचा तपास करीत असताना नरडाणा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना हा प्रकार मानसिक छळातून झाल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आले. या घटनेमध्ये जीवन संपवण्यापूर्वी मयत आसाराम भवुता भिल याने लिहून ठेवलेल्या चिट्ठीत त्यांच्या परिवारावर झालेल्या छळाची माहिती दिली होती.
आरोपी भिला चंद्रा भिल, चंदर झिपा भिल व पोलीस पाटील प्रविण ओंकार पाटील या तिघांनी मयताच्या कुटूंबाचे जिवन जगणे मुश्कील करून टाकले होते. त्यांस झालेल्या शारीरीक व मानसिक त्रासामुळे व आसाराम भिल याचेवर खोटे आरोप लावून त्यांस रात्रीच्या रात्री गांव सोडून जाण्याची धमकी दिली. तसेच जावून फाट्यावर जीव दे, अशी चिथावणी दिली होती. तसेच पुन्हा गावात आला तर तुला परिवारासह ठार मारू, अशी धमकी दिल्याने आरोपी आपल्याला गावात गेला तर मारतील व त्रास देतील म्हणून गावात जावून रहाण्यापेक्षा जीवन संपविण्याचे दुर्दैवी पाऊल उचलले. यातूनच ही सामुहिक जीवन संपविले. या प्रकरणात जीवन संपविण्याचा प्रयत्न करत असताना बचावलेल्या वैशाली भिल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नरडाणा पोलीस ठाण्यात आरोपी भिला चंद्रा भिल, चंदर झिपा भिल व पोलीस पाटील प्रविण ओंकार पाटील या तिघांविरोधात भादंवि कलम ३०६, ३२३, ५०६(२) सह कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यांत आला.
या गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी करत घटनास्थळाचा पंचनामा केला. फिर्यादी वैशाली भिल हिची वैद्यकिय तपासणी करून मयतांचे शवविच्छेदन करण्यांत येवून त्याचा अहवाल प्राप्त केला. तसेच महत्वपूर्ण साक्षीदारांचे जाबजबाब नोंदवून घटनेचा सखोल तपास करत न्यायालयांत सर्व आरोपीं विरूध्द आरोप पत्र दाखल केले.