Dhule Crime : जुने धुळे परिसरात दहशत माजवणाऱ्या तिघांची पोलिसांकडून धिंड
धुळे : शहरातील जुने धुळे परिसरात गायकवाड चौकात दहशत माजवणाऱ्या टोळीविरोधात कठोर कारवाई करत आझाद नगर पोलिसांनी तिघांची धिंड काढली. खुनाच्या प्रयत्नात सहभागी असलेल्या या टोळीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गुन्हेगारी वर्चस्वाच्या वादातून दोन गटांत मोठा संघर्ष झाल्याने परस्परविरोधी तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून गायकवाड चौकात दोन गटांत वाद सुरू होता. यातूनच हाणामारीच्या घटनाही घडल्या. या प्रकाराचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. व्हिडिओत हातात शस्त्र घेऊन एका घरासमोर दहशत माजवताना काही युवक दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर देवरे परिवाराकडून पोलिसांना निवेदन देण्यात आले.
सिद्धार्थ राजू देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ज्ञानसागर ऊर्फ नाना विठ्ठल साळवे, विज श्रीराम अहिरे, सुमित तुकाराम शिंदे, अमर धर्मा अहिरे, योगेश सूर्यवंशी आणि भैय्या शेवतकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या गटाकडून भैय्या बाळू उलभगत (शेवतकर) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार निलेश देवरे, अंजली निलेश देवरे, नाना धांड्या उर्फ सिद्धार्थ देवरे, बेबीबाई राजू देवरे आणि दिगंबर देवरे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गटांमध्ये पूर्वीपासूनच वाद सुरू असून त्याचा परिणाम सामान्य नागरिकांवर होऊ नये, यासाठी पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींची धिंड काढून इशारा दिला की, कोणत्याही प्रकारचा गुन्हेगारी व्यवहार खपवून घेतला जाणार नाही.

