

धुळे : धुळे तालुक्यातील कुलथे, मांडळ, पुरमेपाडा व सय्यदनगर येथील लघु प्रकल्प व कालव्यांचे दुरुस्ती काम आता वेग घेणार आहे. आमदार राघवेंद्र (राम) भदाणे यांच्या प्रयत्नातून एकूण ६.६४ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये मांडळ प्रकल्पाच्या कालव्याचे दुरुस्ती काम तांत्रिक मान्यतेनंतर निविदा प्रक्रियेत दाखल झाले आहे.
आमदार राम भदाणे यांनी तालुक्यातील सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी मंत्रालय ते जिल्हा स्तरापर्यंत पाठपुरावा केला. पावसाळी अधिवेशनात त्यांनी हा विषय प्रभावीपणे मांडून राज्य सरकारचे लक्ष वेधले. त्यानंतर मोठ्या धरणांमधून लघु प्रकल्प व कालव्यांमार्फत पाझर तलाव भरले जात आहेत. मात्र, काही प्रकल्प व कालवे नादुरुस्त अवस्थेत असल्याने पाण्याची नासाडी होत होती.
यासाठी आमदार राम भदाणे यांनी सातत्याने पाठपुरावा करून येथील कामांना प्रशासकीय मान्यता मिळवली, यामध्ये
लघु प्रकल्प कुलथे – 1.36 कोटी
लघु प्रकल्प मांडळ – 47 लाख
लघु प्रकल्प पुरमेपाडा – 1.67 कोटी
सय्यदनगर कालवा – 3.14 कोटी
एकूण खर्च – 6.64 कोटी रुपये
सध्या मांडळ कालव्याचे काम निविदा प्रक्रियेत असून, उर्वरित प्रकल्पांच्या निविदा प्रक्रिया सप्टेंबर महिन्यात राबवण्यात येणार आहेत.
पांझरा नदीवरील शिवकालीन रायवट फड बंधारा नादुरुस्त झालेला आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी अंदाजपत्रक मंडळ कार्यालयात सादर करण्यात आले आहे. वार गावजवळ असूनही नियोजनाच्या अभावामुळे पाण्याची टंचाई जाणवत होती. वार फळ बंधाऱ्याचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, १० ऑगस्टपर्यंत ते मंडळ कार्यालयात सादर करण्यात येणार आहे. यामुळे वार गावाच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.