Latipada Dam Overflow Pudhari
धुळे

Dhule Rain Update | दमदार पावसाने लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो; पांझरा नदीला पूर

दोन्ही समांतर पुलांवरील वाहतूक बंद; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Latipada Dam Overflow

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील पिंपळनेरच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पांझरा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पहाटेपासून नदीला पूर आला असून लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्यावरून ३६९ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

पश्चिम पट्ट्यातील तसेच लगतच्या परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. लाटीपाडा, जामखेडीसह अन्य लघु-मध्यम प्रकल्पांच्या पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. त्यापैकी लाटीपाडा प्रकल्प शंभर टक्के भरल्याने धरण ओव्हरफ्लो झाले असून सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे.

या धरणामुळे पिंपळनेर परिसरातील ५० टक्क्यांहून अधिक क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळतो. तसेच परिसरातील भूजल पातळी वाढण्यासही या प्रकल्पाची मोठी मदत होते. पांझरा प्रकल्पातून डावा आणि उजवा अशा दोन कालव्यांद्वारे सिंचनासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. उजव्या कालव्याची लांबी २२.८० किलोमीटर तर डाव्या कालव्याची लांबी ६.८० किलोमीटर असून सांडव्याची एकूण लांबी २९० मीटर आहे.

पुलांवरील वाहतूक बंद

पांझरा नदीवरील शहरातील दोन्ही समांतर पुलांवरून पाण्याचा प्रवाह वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस प्रशासनाने दोन्ही बाजूंनी बॅरिकेडिंग करून वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. नागरिकांनी पुलावरून वाहन किंवा पायी प्रवास करण्याचा प्रयत्न करू नये, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

नदीतील पाण्याचा वेग आणि प्रवाह वाढलेला असल्याने पुल ओलांडणे धोकादायक ठरू शकते. विशेषतः रात्रीच्या वेळी पाण्याचा अंदाज येत नसल्याने कोणताही धोका पत्करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गाळ काढण्याची मागणी

लाटीपाडा धरणात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून त्यामुळे साठवण क्षमतेवर परिणाम होत आहे. धरणाची मूळ क्षमता कायम राखण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने गाळ काढण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT