Dhule Waghadi Illegal Seeds Seizure  Pudhari
धुळे

Dhule HTBT Cotton Seeds | वाघाडी येथे प्रतिबंधित HTBT कापूस बियाण्यांचा साठा जप्त: दोघांविरुद्ध गुन्हा

बेकायदेशीर बियाण्यांची विक्री करून शेतकरी आणि शासनाची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई : कृषी विभागाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Dhule Waghadi Illegal Seeds Seizure

धुळे : शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथे शासनाने प्रतिबंधित केलेल्या HTBT कापूस बियाण्यांचा साठा कृषी विभागाने जप्त केला. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर बियाण्यांची विक्री करून शेतकरी आणि शासनाची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.

कृषी विभागाला वाघाडी येथील एका घरात विक्रीच्या उद्देशाने प्रतिबंधित HTBT कापूस बियाण्यांचा साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला असता धनराज रामदास पाटील यांच्या राहत्या घरातून विविध कंपन्यांच्या संशयित HTBT कापूस बियाण्यांचा साठा आढळून आला. या कारवाईत सुमारे ९५ हजार रुपये किमतीचे बियाणे जप्त करण्यात आले.

या प्रकरणी तालुका कृषी अधीक्षक तथा बियाणे गुणनियंत्रण अधिकारी विशाल लक्ष्मण मोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धनराज रामदास पाटील (रा. वाघाडी, ता. शिरपूर) आणि नरेंद्र बोरसे (रा. लोणखेडी, ता. साक्री) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी विनापरवाना बियाण्यांचे उत्पादन व विक्रीसाठी साठा केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१६(२) व ३१८(२) तसेच बियाणे कायदा १९६६, बियाणे नियम १९६८, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. तसेच बियाण्यांच्या पाकिटांवर जेनेटिक इंजिनिअरिंग अॅप्रुव्हल कमिटी (GEAC) च्या मंजुरीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता केवळ अधिकृत व परवानाधारक विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. प्रतिबंधित अथवा बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT