धुळे

Dhule Unseasonal Rain : वादळी वाऱ्यासह गारपिटीने पिके भुसपाट, शेतकर्‍यांना भरपाई द्या : कुणाल पाटील

Dhule News : नैसर्गिक आपत्तीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

पुढारी वृत्तसेवा

धुळे : धुळे जिल्ह्याला सोमवारी (दि. ३०) निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला. दुपारनंतर अचानक बदलेल्या हवामानामुळे धुळे तालुक्यात अवकाळी पाऊस आणि भीषण गारपिटीने थैमान घातले. या अस्मानी संकटामुळे शेतशिवाराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, काढणीला आलेली पिके डोळ्यादेखत मातीमोल झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

अस्मानी संकटाचा तडाखा

धुळे तालुक्यातील कुसूंबा, नेर, आनंदखेडे, वार, कुंडाणे, देऊर, लोहगड, लोणेखेडी, उडाणे, गोताणे, चौगाव, नगाव आणि मोराणे यांसह परिसरातील अनेक गावांना वादळी वारा आणि गारपिटीने झोडपून काढले. सकाळपासून असलेल्या उकाड्यानंतर सायंकाळी अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. गारांचा आकार मोठा असल्याने शेतातील उभी पिके अक्षरशः भुईसपाट झाली आहेत.

पिकांची मोठी धूळदाण

या नैसर्गिक आपत्तीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. गारपिटीमुळे कांद्याची पात तुटून पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच उन्हाळी टरबूज, पपई, केळी, डाळींब, आंबा आणि शेवगा यांसारख्या फळबागांनाही या वादळाचा मोठा फटका बसला. केवळ फळपिकेच नव्हे, तर मका, गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी आणि विविध प्रकारचा भाजीपाला गारपिटीच्या तडाख्यात सापडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. वर्षभर रक्ताचे पाणी करून पिकवलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी आता हतबल झाला आहे.

माजी आमदार कुणाल पाटील यांचा मदतीचा शब्द

या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी आमदार कुणाल पाटील यांनी तत्काळ नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतला. त्यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देत, नुकसान झालेल्या भागाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनाम्याचा अहवाल विलंब न लावता सरकारकडे सादर करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना लवकर मदत मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना कुणाल पाटील म्हणाले की, "निसर्गाच्या या प्रकोपाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र, बळीराजाने धीर सोडू नये, मी आणि माझे सहकारी या संकटकाळात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. बाधित शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करू आणि न्याय मिळवून देऊ."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT