Dhule Textile Mill Security Guards Protest Pudhari
धुळे

Dhule Textile Mill Protest | धुळे टेक्स्टाईल मिलच्या सुरक्षा रक्षकांचे थकीत वेतनासाठी आंदोलन

१२ महिन्यांचा पगार, पाच वर्षांचा बोनस व निवृत्त कामगारांची देणी देण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Dhule Textile Mill Security Guards Protest

धुळे : शहरातील धुळे टेक्स्टाईल मिलमधील सुरक्षा रक्षक आणि कामगारांचे गेल्या बारा महिन्यांपासून थकीत असलेले वेतन, पाच वर्षांचा बोनस, हक्काच्या रजेचा पगार तसेच निवृत्त कामगारांच्या प्रलंबित देणी तातडीने अदा करावीत, या मागणीसाठी मिलच्या मुख्य प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने करण्यात आली.

राष्ट्रीय मिल मजदूर संघटनेचे जनरल सेक्रेटरी मच्छिंद्र येरडावकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष दयाराम पाटील, रामकृष्ण बगदे, कामगार नेते अशोक टकले, संभाजी चौगुले, दत्तात्रय पवार यांच्यासह धुळे टेक्स्टाईल मिलमधील सुरक्षा रक्षक आणि कामगार मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत प्रलंबित वेतन आणि विविध हक्कांची रक्कम तातडीने देण्याची मागणी केली.

धुळे टेक्स्टाईल मिल सन २००८ पासून बंद आहे. मात्र, मिलच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक गेल्या अनेक वर्षांपासून तीन शिफ्टमध्ये सेवा बजावत आहेत. त्यांना गेल्या बारा महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. याशिवाय पाच वर्षांचा बोनस, हक्काच्या रजेचा पगार आणि इतर आर्थिक लाभही प्रलंबित असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

मिलमधून निवृत्त झालेल्या कामगारांचीही विविध देणी अद्याप मिळालेली नाहीत. अनेक वर्षे सेवा बजावल्यानंतर निवृत्त होऊनही हक्काची रक्कम मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने या कामगारांच्या प्रश्नांकडेही तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.

केंद्र सरकार तसेच राष्ट्रीय महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन सुरक्षा रक्षक आणि कामगारांचा बारा महिन्यांचा थकीत पगार, बोनस, रजेचा पगार तसेच इतर प्रलंबित हक्कांची रक्कम तातडीने अदा करावी, अशी मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघटनेने केली. कामगारांना त्यांच्या कष्टाचा मोबदला वेळेत मिळणे आवश्यक असून, त्यांच्या आर्थिक अडचणींचा विचार करून शासन व प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका संघटनेने मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT