डिजिटल सातबारा व आठ उताऱ्यांपैकी ४३ सातबारे लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. Pudhari
धुळे

Dhule News | सिंदखेडा तालुक्यात प्रलंबित फेरफार प्रकरणांपैकी २८ अर्ज निकाली: सातबारा उताऱ्यातील त्रुटी दुरुस्तीच्या २३ अर्जांवर कार्यवाही

डिजिटल सातबारा व आठ उताऱ्यांपैकी ४३ सातबारे लाभार्थ्यांना वितरित

पुढारी वृत्तसेवा

Sindkheda Taluka 7/12 Extract Correction

धुळे : सिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथे छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात शेकडो नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. या उपक्रमामुळे गावकऱ्यांच्या प्रलंबित कामांना गती मिळाली.

महसूल विभागाच्या माध्यमातून प्रलंबित फेरफार प्रकरणांपैकी २८ अर्ज निकाली काढण्यात आले. तसेच सातबारा उताऱ्यातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी २३ अर्जांवर कार्यवाही करण्यात आली. डिजिटल सातबारा व आठ उताऱ्यांपैकी ४३ सातबारे लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले.

शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्रांचे १३ विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. तसेच आकर्षित कर विषयक मार्गदर्शन आणि नवीन सनद प्रक्रियेबाबत नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली.

सामाजिक अर्थसहाय्य योजनेंतर्गत ६३ लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्र देण्यात आले. कृषी विभागाने पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी केली, तर ४ शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अनुदान देण्यात आले. भूसंपादन आणि अकृषिक परवानगी संदर्भातील २५ प्रकरणांची सातबारावर नोंद घेण्यात आली.

अन्न व नागरी पुरवठा विभागाने नवीन तसेच विभक्त रेशनकार्ड तयार करून ७७ लाभार्थ्यांना वितरित केले. ‘जिवंत सातबारा’ योजनेअंतर्गत ९५ जणांना सेवा पुरवण्यात आली.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत स्मार्ट कार्ड नोंदणी केंद्र उभारण्यात आले होते, ज्यामुळे नागरिकांना त्वरित नोंदणीची सुविधा मिळाली. आधार सेवा केंद्राद्वारे नवीन आधार कार्ड, नाव व पत्ता दुरुस्ती तसेच मोबाईल व ई-मेल लिंकिंग सेवा देण्यात आल्या.

आरोग्य विभागाने लसीकरण सेवा दिली, तर पशुधन विभागाने जनावरांच्या लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी नायब तहसीलदार राजेश घोलप होते. यावेळी सरपंच सौ. सीमा दिनेश ठाकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर पाटील, माजी सरपंच दगाजी देवरे, परसोलेचे सरपंच एम. एस. पाटील, सुरायचे सरपंच मोहन राजपूत, मंडळ कृषी अधिकारी रेणुका राजपूत, अक्षय गवांडे, पोलिस पाटील प्रफुल्ल पाटील, महेश कुमार शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.

महेश कुमार शास्त्री यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर रेणुका राजपूत यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT