७५ वर्षांपासून अस्तित्वात असलेले ऐतिहासिक शिवाजी मार्केट अखेर सोमवारी रात्री पाडण्यात आले Pudhari
धुळे

Dhule Shivaji Market | धुळ्यातील ऐतिहासिक शिवाजी मार्केट अखेर जमीनदोस्त; व्यापाऱ्यांचा न्यायालयीन लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार

पोलीस बंदोबस्तात आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर रात्रभर पाडकामाची कारवाई करण्यात आली

पुढारी वृत्तसेवा

Shivaji Market Demolition Dhule

धुळे : धुळे शहरातील पाच कंदील चौक परिसरात सुमारे ७५ वर्षांपासून अस्तित्वात असलेले ऐतिहासिक शिवाजी मार्केट अखेर सोमवारी रात्री पाडण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून व्यापाऱ्यांनी न्यायालयाकडून स्थगिती मिळाल्याचा दावा करत संबंधित आदेशाची प्रत महानगरपालिका आणि प्रशासनाकडे सादर करून पाडकामाला तात्पुरती स्थगिती मिळवली होती. मात्र रात्री पोलीस बंदोबस्तात आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर रात्रभर पाडकामाची कारवाई करण्यात आली.

या कारवाईनंतर शिवाजी मार्केट व्यापारी असोसिएशनने तीव्र नाराजी व्यक्त केली असून न्यायालयात अवमान याचिका दाखल करून कायदेशीर लढा सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष निलेश किंगर यांनी यासंदर्भात माहिती दिली.

भारत-पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानातून स्थलांतरित होऊन धुळ्यात आलेल्या सिंधी व्यापाऱ्यांसाठी शासनाने पाच कंदील चौक परिसरात चार मार्केट उभारली होती. या मार्केटमधील गाळे सध्या धुळे महानगरपालिकेच्या मालकीचे आहेत. शिवाजी मार्केटमधील गाळ्यांच्या भाडेपट्ट्याचा वाद २०१६ पासून न्यायप्रविष्ट असून या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यापूर्वी महानगरपालिकेने मार्केटला सील केले होते. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर सील हटविण्यात आले आणि व्यापाऱ्यांनी पुन्हा व्यवसाय सुरू केला होता.

गेल्या दोन महिन्यांपासून महानगरपालिकेने जुनी मार्केट पाडून विकासकाच्या माध्यमातून नवीन व्यापारी संकुल उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याअंतर्गत प्रथम भाजी मार्केट आणि त्यानंतर फळ मार्केट पाडण्यात आले. मात्र शिवाजी मार्केटचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याने या मार्केटचे पाडकाम रखडले होते.

मंगळवारी दिवसभर न्यायालयीन आदेशांवरून व्यापारी आणि प्रशासन यांच्यात दावे-प्रतिदावे सुरू होते. रात्री उशिरा अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रसाद जाधव आणि राजेंद्र माईनकर यांच्या उपस्थितीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पाडकामाला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने शिवाजी मार्केटमधील दुकानांचे पाडकाम करण्यात आले.

दरम्यान, या कारवाईविरोधात न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यासह पुढील कायदेशीर पर्यायांचा अवलंब केला जाणार असल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निलेश किंगर यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT