Shirpur Police Online Extortion Gang Busted  Pudhari
धुळे

Dhule Crime | अपहरण करून ऑनलाइन खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोघे अटकेत; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

शिरपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Shirpur Police Online Extortion Gang Busted

धुळे : अपहरण करून ऑनलाइन पद्धतीने खंडणी उकळणाऱ्या टोळीचा शिरपूर शहर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २ लाख ९६ हजार ५०० रुपयांची रोकड आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

शिरपूर येथील प्रांशु नवीनकुमार वर्मा (वय ३०) यांना आरोपींनी विश्वासात घेऊन मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर त्यांना शहरातील एका निर्जन ठिकाणी नेऊन मारहाण केली व धमकावत विविध क्यूआर कोडच्या माध्यमातून ३ लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. त्यानंतर ही रक्कम त्यांच्या साथीदारामार्फत रोख स्वरूपात घेण्यास सांगितले.

या घटनेनंतर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४०(२)(३) आणि ३०९(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाला वेग दिला.

पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि स्थानिक माहितीदारांच्या सहाय्याने आरोपींचा माग काढला. अवघ्या २४ तासांत पवन शंकर हटकर (वय २२, रा. जनता नगर, शिरपूर) आणि वैभव रामेश्वर सोनवणे (वय २५, रा. मातोश्री कॉलनी, शिंगावे शिवार, शिरपूर) यांना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणात बंटी उर्फ हर्षल मनोहर बोरसे हा सहभागी असल्याचे निष्पन्न झाले असून, तो सध्या फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

अटक आरोपींकडून पोलिसांनी ५०० रुपयांच्या ५७७ नोटा (किंमत २ लाख ८८ हजार ५०० रुपये), १०० रुपयांच्या ३० नोटा (किंमत ३ हजार रुपये) तसेच ओप्पो ए-३८ कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण २ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

या कारवाईमुळे अपहरण करून ऑनलाइन खंडणी उकळणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांनी प्रभावी कारवाईचा संदेश दिला असून, सायबर आणि खंडणीसारख्या गुन्ह्यांवर धुळे जिल्हा पोलीस बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT