Dhule Crime | घोडदेमध्ये मध्यरात्री दरोडेखोरांचा धुमाकूळ; निवृत्त बँक अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

दाम्पत्‍यावर हल्ला करुन सोन्याचे दागिने लंपास
Dhule Crime | घोडदेमध्ये मध्यरात्री दरोडेखोरांचा धुमाकूळ; निवृत्त बँक अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला
Published on
Updated on

पिंपळनेर:साक्री तालुक्यातील घोडदे येथे एका सेवानिवृत्त बैंक मॅनेजरच्या घरावर दरोडा पडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.तीन अनोळखी दरोडेखोरांनी घरात घुसून दांपत्याला लोखंडी रॉड आणि कुऱ्हाडीने मारहाण करत सोन्याची पोत लांबवली. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

साक्री तालुक्यातील घोडदे येथील प्रकाश बाबुलाल क्षीरसागर (६२) हे सेवानिवृत्त बँक मॅनेजर असून ते आपल्या कुटुंबासह राहतात.रात्री २.३० वाजेच्या सुमारास तीन अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्या घराच्या मागील सेफ्टी गेटची कडी उघडून आत प्रवेश केला.घरात घुसलेल्या दरोडेखोरांपैकी एकाने हातातील लोखंडी रॉडने प्रकाश क्षीरसागर यांच्या कंबर व पाठीच्या डाव्या बाजूला जबर मार दिला.तर दुसऱ्या दरोडेखोराने त्याच्याकडील कुऱ्हाडीने थेट क्षीरसागर यांच्या कपाळावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

त्यानंतर कुऱ्हाड घेतलेल्या दरोडेखोराने प्रकाश श्रीरसागर यांची पत्नी हेमलता यांना कुऱ्हाडीचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची भीती घातली.त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून घेतली.

दागिने लंपास केल्यानंतर तिन्ही दरोडेखोरांनी घराच्या मागील दरवाजातून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. घटनेची माहिती मिळताच साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.या घटनेचे गांभीर्य ओळखून साक्रीचे पोलीस उपअधीक्षक सुधीर पाटील, पोलीस निरीक्षक दीपक वळवी, पोलीस उपनिरीक्षक दीपक रौंदळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासाच्या अनुषंगाने सूचना दिल्यात.

याप्रकरणी प्रकाश क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून साक्री पोलीस ठाण्यात तीन अज्ञात दरोडेखोरांविरूध्द भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४),११८ (१),३३१ (४),३०५,३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रौंदळ करीत आहेत या धाडसी दरोड्यामुळे घोडदे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस दरोडेखोरांचा कसून शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news