Interstate Burglary Gang Arrested Shirpur Police
धुळे : शिरपूर तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील तिघांना शिरपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून चोरीतील सोने-चांदीचे दागिने मध्य प्रदेशातील सेंधवा येथील सराफा व्यावसायिकांकडून जप्त करण्यात आले असून, या कारवाईमुळे दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. संबंधित आरोपींना यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतरच्या तपासात शिरपूर तालुक्यातील घरफोड्यांचाही उलगडा झाला.
शिरपूर तालुक्यातील नवे अंतुर्ली येथील रहिवासी विलास देविदास ईशी हे कुटुंबासह घराच्या स्लॅबवर झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून सुमारे ४४ हजार ५५० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेले होते. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) व ३३१(४) अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी विशेष तपास पथकाची स्थापना करून तपास सुरू केला.
दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी शिरपूर येथील घरफोडीची कबुली दिल्याची माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार ट्रान्सफर वॉरंटद्वारे आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यावेळी मिठाराम भावसिंग तडवी (रा. आंबासुका, ता. सेंधवा), रतला मालसिंग मेहडे आणि जगदीश प्रताप किराडे यांनी नवे अंतुर्ली येथील घरफोडीची कबुली दिली.
आरोपींनी चोरीतील सोने-चांदीचे दागिने सेंधवा येथील किशोर मोतीलाल सोनी ज्वेलर्स यांना विकल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित सराफा व्यावसायिकाकडे तपास करून पिवळ्या धातूची लगड व चांदीची लगड जप्त केली.
पुढील चौकशीत आरोपींनी शिरपूर तालुक्यातील बोरगाव येथेही घरफोडी केल्याची कबुली दिली. या चोरीतील दागिने सेंधवा येथील शांतीलालजी सोनी ज्वेलर्स यांना विकल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित सराफा व्यावसायिकाकडून पिवळ्या धातूची लगड, चांदीची दोन बिस्किटे आणि एक चांदीची लगड जप्त केली.
या कारवाईमुळे शिरपूर तालुक्यातील दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात शिरपूर शहर पोलिसांना यश आले असून, पुढील तपास सुरू आहे.