

Shirpur Illegal Liquor Seized
धुळे : शिरपूर तालुक्यातील जोयदा गावात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि शिरपूर तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणात अवैध दारू साठा आणि दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन जप्त केले आहे. या कारवाईत एकूण ६७ लाख ७७ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, जोयदा येथील ताराचंद सायसिंग पावरा यांच्या ताब्यातील गोडाऊनमध्ये मद्यार्क, ब्लेंड आणि परराज्यातील दारू साठवून बेकायदेशीर व्यवसाय केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकण्यात आला.
या छाप्यात २५० लिटर क्षमतेचे ४७ प्लास्टिक ड्रम (११,७५० लिटर) मद्यार्क, २५० लिटर क्षमतेचे ४५ ड्रम (१९,२५० लिटर) ब्लेंड, ३५ लिटर क्षमतेचे १२ ड्रम (४२० लिटर) आणि ५० लिटर क्षमतेचे २ ड्रम (१०० लिटर) असा मोठा साठा आढळून आला. तसेच, दमण राज्यात विक्रीसाठी तयार करण्यात आलेल्या इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या १८० मिलीच्या २,४०० बाटल्या (५० बॉक्स) आणि मॅकडोवेल नं. १ व्हिस्कीच्या ४,०८० बाटल्या (८५ बॉक्स) जप्त करण्यात आल्या.
या प्रकरणात गोडाऊन मालक ताराचंद पावरा आणि मद्यसाठ्याचा मालक प्रवीण भालचंद्र वाणी उर्फ दादा वाणी हे दोघेही फरार असून, त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, दादा वाणी याच्यावर यापूर्वीही बनावट दारू निर्मिती आणि दारू तस्करीचे अनेक गुन्हे नोंद आहेत. काही काळ तो भूमिगत असल्याचे सांगितले जात होते; मात्र या कारवाईत जप्त करण्यात आलेला साठा त्याचाच असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बी. व्ही. हिप्परगेकर, दुय्यम निरीक्षक संतोष निकम, डी. जी. गवळी तसेच शिरपूर तालुका पोलिसांचे उपनिरीक्षक मिलिंद पवार आणि त्यांच्या पथकाने संयुक्तपणे केली.