गुन्हेगारी टोळी तडीपार (File Photo)
धुळे

Shirpur Crime | शिरपूर शहरातील गुन्हेगारी टोळीतील 5 जण सहा महिन्यांसाठी हद्दपार

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षकांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Shirpur Criminal Gang Externment Order

धुळे : आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शिरपूर शहरातील गुन्हेगारी टोळीतील पाच सराईत गुन्हेगारांना सहा महिन्यांसाठी धुळे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ मधील कलम ५५ अन्वये ही कारवाई केली.

धुळे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन, संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम ५५ नुसार हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा आढावा घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली.

अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या माध्यमातून या गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी सराईत टोळीतील सदस्यांना धुळे जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव सादर केला.

या प्रस्तावाची उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी सविस्तर चौकशी करून शिफारस अहवाल पोलिस अधीक्षकांकडे सादर केला. सुनावणीदरम्यान दाखल माहिती, संबंधित गुन्हेगारांविरुद्ध नोंद असलेले गुन्हे तसेच साक्षीदारांचे म्हणणे तपासण्यात आले. त्यांच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या वर्तनामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास आणि मालमत्तेस धोका निर्माण होत असल्याचे तसेच संबंधितांविरुद्ध तक्रार अथवा साक्ष देण्यास नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी रवि ऊर्फ रविंद्र आधार सोनवणे, सनि धुडकू सोनवणे, ऋषिकेश धुडकू सोनवणे, भरत नाना सोनवणे आणि गोकुळ सुभाष (सुहास) सोनवणे (सर्व रा. शिरपूर) यांना सहा महिन्यांसाठी धुळे जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT