Accident News  Pudhari File Photo
धुळे

Dhule Bus Accident | शिरपूर-चोपडा महामार्गावर बसच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू

चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Shirpur Chopda Highway Bus Collision

धुळे : शिरपूर-चोपडा महामार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या भरधाव बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी बस चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा अपघात शिरपूरहून चोपडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पवन टेक्सटाईल कंपनीजवळ झाला. भाटपुरा (ता. शिरपूर) येथील चेतन योगराज गुजर (वय 20) आणि कल्पेश नितीन पाटील (वय 21) हे दोघे मित्र एमएच-18 बीपी-1155 क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रवास करत होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एमएच-14 बीटी-2349 क्रमांकाच्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने दुचाकीला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात चेतन गुजर आणि कल्पेश पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले.

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा पाटील, उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, हर्षल पाटील तसेच पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही तरुणांचे मृतदेह एकाच वेळी त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रकरणी विलास काशिनाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बस चालक अरुण बळीराम राठोड यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(1), 281, 125(क)(ख), 324(4) तसेच मोटार वाहन कायद्यान्वये शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT