

Sakri Hotel Raid Punjab Youth Arrested
धुळे : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी गावाजवळील एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून पंजाबमधील एका तरुणाकडून सुमारे २ लाख ३ हजार रुपयांचा एमडी (मेफेड्रॉन) व डोडा (पॉपी स्ट्रॉ) हा अमली पदार्थ जप्त केला. या प्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात मालमत्तेवरील चोरी, अमली पदार्थांची तस्करी व अन्य गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सर्व पोलीस ठाण्यांना रात्रीची गस्त अधिक कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या पथकाकडून गस्त सुरू असताना गोपनीय माहिती मिळाली. शेवाळी गावाच्या शिवारातील एच.पी. पेट्रोल पंपाजवळील हॉटेल सतलोज येथे एक व्यक्ती मेफेड्रॉन विक्रीसाठी बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी तत्काळ हॉटेलवर छापा टाकला. यावेळी एक व्यक्ती पोलिसांना पाहून संशयास्पद हालचाली करत काही वस्तू लपविण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव राजकुमार मुल्कराज वाल्मीकी (वय ४२, रा. मुक्तसर रोड, कोट कपूर, फरीदकोट, पंजाब) असे सांगितले.
त्याच्या अंगझडतीदरम्यान एका प्लास्टिकच्या पिशवीत १८ ग्रॅम वजनाचा सुमारे १ लाख ८० हजार रुपये किमतीचा एमडी (मेफेड्रॉन) तसेच १.३७७ किलो वजनाचा सुमारे २० हजार ६५५ रुपये किमतीचा डोडा (पॉपी स्ट्रॉ) असा एकूण २ लाख ३ हजार २५ रुपयांचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ (NDPS Act) अंतर्गत कलम ८(क), १५(क), २२(ब) आणि २९ अन्वये साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.