Shindkheda Gajraj Lingayat Case
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथील गजराज उर्फ गज्या सोमनाथ लिंगायत यांच्या बहुचर्चित खूनप्रकरणी आरोपी विशाल उर्फ चिकू दगडू नेतले याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. चौथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जे. गायकवाड यांनी हा निकाल दिला. आरोपीला भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड, तर कलम ४५२ अन्वये पाच वर्षांचा कारावास आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त सक्तमजुरीची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे.
या प्रकरणाची घटना ५ जुलै २०२३ रोजी दुपारी दोनच्या सुमारास नरडाणा येथे घडली होती. दारू पिणे आणि पैशांच्या देवाणघेवाणीवरून आरोपी विशाल नेतले व गजराज उर्फ गज्या लिंगायत यांच्यात सोड्याच्या गाडीवर वाद झाला. या वादादरम्यान लिंगायत यांनी आरोपीला काचेचा ग्लास फेकून मारल्याने तो जखमी झाला होता. त्यानंतर लिंगायत हे नरडाणा येथील भिल्लवस्तीतील आपल्या घरी निघून गेले.
दरम्यान, झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपीने फळविक्रेता वसीम यांच्या दुकानावरील नारळ सोलण्याचा लोखंडी सुरा घेतला. त्यानंतर लिंगायत यांच्या घरी जाऊन त्यांच्या मानेवर, पोटावर आणि छातीवर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लिंगायत यांना उपचारासाठी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर मृताचे भाऊ नकुल सोमनाथ लिंगायत यांनी नरडाणा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुरुवातीला भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासानंतर आरोपीविरुद्ध कलम ३०२ आणि ३०७ अन्वये आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. तत्कालीन अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. गणेश वाय. पाटील यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. घटनास्थळाचे पंच, शस्त्र जप्तीचे पंच, फिर्यादी तथा प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह अन्य साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. तसेच डॉ. रमेश गढरी, तपास अधिकारी सुरेश शिरसाठ आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या साक्षीही महत्त्वपूर्ण ठरल्या.
सरकार पक्षातर्फे प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षी, रासायनिक विश्लेषणाचे अहवाल आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे युक्तिवाद करण्यात आला. यावेळी अॅड. गणेश पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा संदर्भ देत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
न्यायालयाने खटल्यातील एकूण पुरावे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा विचार करून आरोपीला जन्मठेपेसह दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह वाय. तवर यांचे मार्गदर्शन लाभले.