Pudhari
धुळे

Dhule Crime | 'सेकंड करन्सी'च्या आमिषाने लूट करणाऱ्या टोळीतील एकाला अटक; अन्य साथीदारांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना

धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजनाळे व हेंकळवाडी परिसरातील तरुणांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

Second Currency Fraud Dhule

धुळे : इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर 'सेकंड करन्सी'च्या नावाखाली लाखोंच्या परताव्याचे आमिष दाखवत नागरिकांना जाळ्यात ओढून त्यांची लूट करणाऱ्या टोळीतील एका संशयिताला धुळे तालुका पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजनाळे व हेंकळवाडी परिसरातील काही तरुणांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर "Indian Second Currency Milegi", "1 लाख का 7 लाख", "2 लाख का 15 लाख" अशा आकर्षक शीर्षकांच्या रील्स प्रसारित केल्या होत्या. या रील्समध्ये संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक देण्यात येत होता. त्या क्रमांकावर संपर्क साधणाऱ्या व्यक्तींना दुर्मिळ चलन दाखविण्याच्या बहाण्याने धुळे जिल्ह्यात बोलावले जात असे.

आर्थिक फायद्याच्या आमिषाला बळी पडलेल्या व्यक्तींना अजनाळे व हेंकळवाडी परिसरातील निर्जन ठिकाणी नेऊन त्यांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केली जात होती. त्यानंतर त्यांच्याकडील रोख रक्कम, दागिने आणि मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेत लूट करण्यात येत होती. भीतीपोटी अनेक पीडितांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली नसल्याने या प्रकारचे गुन्हे बराच काळ उघडकीस आले नव्हते.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 310(2), 318(4), 61(2), 352 आणि 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे धुळे तालुका पोलिसांनी अजनाळे येथील पारधी वस्तीत राहणाऱ्या मनोहर कंतुलाल पवार याला ताब्यात घेऊन अटक केली.

चौकशीदरम्यान मनोहर पवार याने लुटीच्या गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली असून या गुन्ह्यात आणखी काही साथीदार सहभागी असल्याची माहितीही पोलिसांना दिली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT