Sakal Maratha Samaj on Dhirendra Shastri
धुळे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात अवमानकारक वक्तव्य केल्याच्या प्रकरणाचे आज (दि.२७) धुळ्यात पडसाद उमटले. प्रवचनकार धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात सकल मराठा समाजाने तीव्र घोषणाबाजी करून प्रशासनाकडे या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी केली आहे .प्रशासनाने गुन्हा दाखल न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करून या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी भानुदास बगदे, सुधाकर बेंद्रे, विनोद जगताप, राजेंद्र काळे, निंबा मराठे, रणजीत भोसले, उल्हास यादव, संदीप पाटोळे, वीरेंद्र मोरे, भानुदास चौधरी, वामन मोहिते, सुरेश पवार, महेश गायकवाड, दीपक रौंदळ, संतोष लाकडे, मनोज रुईकर, सुलभाताई कुवर, नूतनताई पाटील, बाळासाहेब ठोंबरे, हेमंत जगदाळे, प्रफुल माने, नरेंद्र हेमाडे, गोविंद वाघ, कल्पेश नेरकर, देवेंद्र पवार, दिनेश चव्हाण, नितीन पाटील नगाव, वैभव पाटील, विक्रमसिंह काळे, अमर फरताडे यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित होता.
यानंतर जिल्हा प्रशासनाच्या समोर शिष्टमंडळाने आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी सांगितले की, नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत तथाकथित भोंदू बाबा धिरेंद्र शास्त्री यांनी कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याच्या उद्देशाने समर्थ रामदास स्वामी यांच्याशी कपोकल्पित संदर्भ जोडून काल्पनिक व्यक्तव्य केले. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शिवप्रेमी व बहुजन समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
कदाचित हे वक्तव्य मुद्दाम केले आहे. त्यांना महाराष्ट्रात बंदी घालावी तसेच त्याच्यावर गांभीर्याने लक्ष देऊन कायदेशीर गुन्हा दाखल करावा. तसेच आयोजकांवर पण त्याच पद्धतीने दंगली घडवणेचा प्रयत्न करणे, अशांतता निर्माण करणे तसेच महापुरुष यांची बदनामी करणे याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा.
तसेच राजमाता जिजाऊ संत तुकाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सारख्या महापुरुषांचा जर कोणी अपमान करीत असेल तर त्यांच्या वर देशद्रोही गुन्हा दाखल करण्याचा कायदा करण्यात यावा. तसेच आपल्या आदेशाने धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करण्यात आली. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.