पिस्तुलाचा धाक दाखवून चार कोटी रुपयांची रोकड लांबवली. Dhule Robbery Case (Pudhari File Photo)
धुळे

Dhule Robbery Case | मुंबई आग्रा महामार्गावर पिस्तुलाचा धाक दाखवून चार कोटी रुपयांची रोकड लांबवली

Dhule LCB Investigation | स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच धुळे तालुका पोलिसांनी विशेष पथके गठीत करून हा दरोडा घालणाऱ्या सात जणांच्या टोळक्याला शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Agra Highway Heist

धुळे : मुंबई आग्रा महामार्गावर धुळे तालुक्यातील पुरमेपाडा जवळ पिस्तुलाचा धाक दाखवून स्कार्पिओ गाडीतून जाणाऱ्या दोघांकडून सुमारे चार कोटी रुपयांची मोठी रोकड लुटण्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच धुळे तालुका पोलिसांनी विशेष पथके गठीत करून हा दरोडा घालणाऱ्या सात जणांच्या टोळक्याला शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

धुळे तालुक्यातील पुरमेपाडा जवळ उड्डाणपुलाचे काम सुरू असून वाहने सर्विस रोडने वळवण्यात आलेली आहे. धुळे शहराकडून मुंबईकडे जाणाऱ्या एम एच 43 सीसी 064 या क्रमांकाच्या स्कार्पिओ गाडीला ओव्हरटेक करून एका स्विफ्ट गाडीने अडवले. या गाडीतून उतरलेल्या चौघांनी पिस्तुलाचा धाक दाखवत स्कार्पिओ मधील कल्पेश पटेल यांना खाली उतरवले. त्यानंतर त्याला स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये बसवून ही गाडी महामार्गावर वळवण्यात आली.

या नंतर आणखी एका आलेल्या कारमधून उतरलेल्या तिघांनी स्कार्पिओ मधील भरतभाई भालिया याला देखील खाली उतरवले. त्याला देखील या अनोळखी कार मध्ये बसवण्यात आले. तर स्कार्पिओ गाडीचा ताबा अन्य एका युवकाने घेतला. चोरट्यांच्या दोन्ही गाड्या सुमारे अर्धा ते पाऊण तास महामार्गावर फिरवण्यात आल्या. यानंतर भरतभाई भालिया याचे हात बांधून त्याला पुरमेपाडा जवळील एका नाल्या जवळ सोडून देण्यात आले. तर कल्पेश पटेल याला देखील धुळे शहरालगत असणाऱ्या लळींग किल्ल्याजवळील बारीत सोडण्यात आले. यानंतर त्यांची कार पुरमेपाडा शिवारातच बेवारस सोडून देण्यात आली.

या घटनेनंतर भेदरलेल्या कल्पेश पटेल आणि भरतभाई भालिया यांनी मालेगाव शहर गाठून तेथील पोलीस ठाण्याला माहिती दिली. मात्र हा प्रकार धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला असल्यामुळे त्यांना धुळे शहराकडे पाठवण्यात आले. यानंतर या घटनेच्या उलगडा झाला.

मिळालेल्या माहितीनुसार कल्पेश पटेल आणि भरतभाई भालिया यांनी तीन जुलै रोजी नाशिक इथून लखनऊ कडे स्कार्पिओ गाडीतून प्रयाण केले होते. लखनऊ येथे ते चार जुलै रोजी पहाटे सहा वाजेला पोहोचले. त्यानंतर दोन तासात त्यांनी एका ऑफिसमधून सुमारे चार कोटी रुपये घेतले. यानंतर ते आळीपाळीने गाडी चालवत मुंबई आग्रा महामार्गाने धुळे तालुक्यातील पुरमेपाडा जवळ पोहोचले. यानंतर दोन कार मधून आलेल्या सात जणांच्या टोळक्याने त्यांना अशा प्रकारे पिस्तुलाचा धाक दाखवून स्कार्पियो मधून उतरवले. यानंतर स्कार्पिओ मधील रोकड काढून पलायन केले.

दरम्यान ही रक्कम हवाल्याची असल्याचे सांगितले जात आहे. मात्र पटेल आणि भालिया यांनी रोकड एका कंपनीचा एग्रीकल्चर आणि मसाला उद्योग असून ही रक्कम त्यासाठीच मुंबई येथे घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर रकमेबाबत देखील या दोघांकडून पोलिसांना गोंधळाची माहिती दिली जाते आहे. त्यामुळे या रोकडच्या मालकाला गुजरात मधून पाचरण करण्यात आले आहे. त्याच्याकडून ही रोकड नेमकी कशासाठी लखनऊ येथून मुंबईकडे जात होती. याची माहिती घेतली जात आहे.

दरम्यान घटनास्थळाची पाहणी आज पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील यांनी पथकासह केली. तत्पूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली. या सर्व अधिकाऱ्यांनी श्वानपथकाची मदत देखील घेतली. मात्र त्याचा फारसा उपयोग होऊ शकला नाही. तर पुरमेपाडा जवळ सापडलेल्या स्कार्पिओ गाडी मधून चोरट्यांच्या हाताचे ठसे देखील घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

यातून चोरट्यांचा माग काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार आणि तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील या दोघांनी वेगवेगळे पथक तयार करून केले असून चोरट्याचा माग काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर आज सायंकाळी उशिरापर्यंत या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम तालुका पोलीस ठाण्यात सुरू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT