dhule accident four youths job seeker death Maharashtra
धुळे : शिरपूर ते चोपडा महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकने धडक दिल्याने दुचाकी वरील चार जण ठार झाल्याची घटना घडली आहे. मृत हे मध्यप्रदेश राज्यातील रहिवासी असून ते रोजगारासाठी महाराष्ट्रातील शिरपूर तालुक्यात आल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. या संदर्भात थाळनेर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यप्रदेश राज्यातील रहिवासी असणारे चौघे युवक रोजगाराच्या शोधासाठी शिरपूर तालुक्यात आले होते. यातील इसराम भिलाला हे या तिघांना सोबत घेऊन मोटारसायकलने (क्र. एमपी-१०-झेडएन-३२२६) शिरपूरकडून चोपड्याकडे जात असतांना सावेर गावाच्या शिवारात चोपड्याकडून शिरपूरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या माल वाहतूक ट्रकने (क्र. एचआर-५५-एटी- १३५५) मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली.
या अपघातात लुमरीया लालसिंग भिलाला (वय २५) व इसराम कालू भिलाला (वय ४८, दोन्ही रा. बुद्रा, ता. राजपूर, जि. बडवानी), सुरेश रमेश कनासे (वय २६) आणि महेश लालसिंग कनासे (वय ३१, रा. बालिया, ता. सनावद, जि. खरगोन, मध्य प्रदेश) हे ठार झाले आहेत. या अपघातामध्ये मोटारसायकलचा चक्काचूर झाला.
अपघात होताच ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. मात्र महामार्गाच्या लगत शेतात काम करणाऱ्या मजुरांनी तसेच काही वाहन चालकांनी तातडीने मदत कार्य सुरू करून केले. दरम्यान ही माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलीस पथक देखील घटनास्थळी पोहोचले.
यासंदर्भात पन्नालाल कालूराम सिसोदिया (रा. बुद्रा, ता. राजपुर, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) यांनी थाळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून थाळनेर पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६ (१), १२५ (अ) (ब), २८१, ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ व १३४/१८७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.