Additional Collector Subhash Borkar Pudhari
धुळे

Dhule Water Crisis | धुळे जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठा पिण्यासाठी आरक्षित ठेवा: अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर

बंधारे व पाझरतलावांच्या दुरुस्तीची कामे हाती घेऊन गाळमुक्त धरण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी

पुढारी वृत्तसेवा

Additional Collector Subhash Borkar

धुळे : एल निनो परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धरणे व जलाशयांमधील उपलब्ध पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांनी बुधवारी (दि.१७) दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज अपर जिल्हाधिकारी बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, उपवनसंरक्षक मोहन नाईकवाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप, धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र अग्रवाल, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर (धुळे), शरद मंडलिक (शिरपूर), जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गिरीष पाटील, तहसीलदार प्रविण चव्हाणके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अपर जिल्हाधिकारी बोरकर म्हणाले की, जिल्ह्यात भविष्यात उद्भवू शकणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन 31 ऑगस्ट 2026 पर्यंत सर्व शहरी व ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा होण्यासाठी धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा आरक्षित करण्यात यावा. धरणांमधून सिंचनासाठी प्रस्तावित अथवा सुरू असलेली पाणी आवर्तने तातडीने बंद करण्यात यावीत. नागरिकांना पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध राहावे यासाठी धरणे व जलाशयांतील उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर व्यवस्थापन करावे.

ज्या ठिकाणी पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे, त्या ठिकाणी विहिरी व बोअरवेल अधिग्रहित करून आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा. धरणे, कालवे, नद्या, तलाव व इतर जलस्रोतांमधून होणारा अनधिकृत व बेकायदेशीर पाणी उपसा तत्काळ थांबविण्यात यावा. यासाठी महसूल, पोलिस व जलसंपदा विभागांनी नियमित तपासणी मोहीम राबवावी. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीतील पाझर तलाव, गाव तलाव, कोल्हापूर प्रकार बंधारे व धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती संकलित करावी.

वन विभागाने वन्यप्राण्यांसाठी पाणी व चाऱ्याची व्यवस्था करावी. पशुसंवर्धन विभागाने ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरेल इतक्या पशुखाद्याचा साठा उपलब्ध होईल, असे नियोजन करावे. बंधारे व पाझरतलावांच्या दुरुस्तीची कामे हाती घेऊन गाळमुक्त धरण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही अपर जिल्हाधिकारी बोरकर यांनी यावेळी दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT