Dhule police Anti-narcotics operation  Pudhari
धुळे

Dhule Crime | धुळे पोलिसांकडून अंमली पदार्थांचा ७ कोटींचा साठा नष्ट

धुळे तालुका, शिरपूर तालुका, सोनगीर, थाळनेर, शिरपूर शहर, नरडाणा आणि मोहाडी नगर पोलीस ठाण्यातील २५ गुन्ह्यांमधील मुद्देमाल

पुढारी वृत्तसेवा

Dhule police Anti-narcotics operation

धुळे : धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचा मोठा साठा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट केला. या कारवाईत तब्बल ७ कोटी ४७ लाख १६ हजार १०० रुपयांचा, एकूण ३६२४.६०० किलो अंमली पदार्थाचा समावेश होता.

जिल्ह्यातील धुळे तालुका, शिरपूर तालुका, सोनगीर, थाळनेर, शिरपूर शहर, नरडाणा आणि मोहाडी नगर पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या २५ गुन्ह्यांमधील हा मुद्देमाल होता. शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या मागील मोकळ्या जागेत खड्डा करून या अंमली पदार्थांचा नाश करण्यात आला.

जिल्हास्तरीय प्रादेशिक अंमली पदार्थ नाश समितीचे अध्यक्ष तथा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, सदस्य तथा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव, तहसीलदार महेंद्र माळी तसेच सहायक रासायनिक विश्लेषक एम. ए. कुलकर्णी यांच्या उपस्थितीत कागदपत्रांची पडताळणी करून मुद्देमालाची मोजणी करण्यात आली.

नंतर खड्ड्यात शेणखत, युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि ट्रायकोडर्मा यांचे मिश्रण टाकून अंमली पदार्थावर प्रक्रिया करण्यात आली व तो पूर्णपणे बुजवून कंपोस्ट पद्धतीने नष्ट करण्यात आला.

या कारवाईत ५ कोटी २७ लाख ४२ हजार ७५० रुपये किंमतीचा २१०९.७१० किलो सुका गांजा, २ कोटी १ लाख ७३ हजार ९५० रुपये किमतीची १३४४.९३० किलो गांजाची झाडे आणि १७ लाख ९९ हजार ४०० रुपये किमतीची अफूची बोंडे असा एकूण साठा नष्ट करण्यात आला.

कारवाईदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी वनरक्षक महारु देसाई आणि रविंद्र पावरा (वन परिक्षेत्र कार्यालय, सांगवी) यांच्या उपस्थितीत पंचनामा केला. तसेच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे, शिरपूर शहरचे निरीक्षक किशोरकुमार परदेशी, थाळनेरचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT