PSI House Burglary Pimpalner Pudhari
धुळे

Dhule Theft | पिंपळनेरमध्ये पीएसआयचे घर फोडले; सोने-चांदीसह रोकड लंपास

बाथरूमची खिडकी तोडून चोरट्यांचा प्रवेश; पोलीस ठाण्याजवळील चोरीने खळबळ, श्वान पथकाकडून माग काढण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

PSI House Burglary Pimpalner

पिंपळनेर: पिंपळनेर शहरातील सामोडे चौफुली परिसरात चोरट्यांनी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) तुषार विजय अहिरे यांच्या बंद घराला लक्ष्य केले. बाथरूमची खिडकी तोडून घरात प्रवेश केलेल्या चोरट्यांनी दोन सोन्याच्या अंगठ्या, रोकड आणि चांदीची भांडी असा ऐवज चोरून नेला. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीएसआय तुषार अहिरे हे सामोडे चौफुली परिसरात वास्तव्यास आहेत. सध्या ते मुंबईतील लालबाग-परळ येथे कार्यरत आहेत. कामानिमित्त ते काल सायंकाळी पाचच्या सुमारास दोंडाईचा येथे गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. ही संधी साधून चोरट्यांनी घराच्या बाथरूमची खिडकी तोडली आणि आत प्रवेश केला.

चोरट्यांनी घरातून प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, सात ते आठ हजार रुपयांची रोकड तसेच चांदीची भांडी चोरून नेली. चोरीला गेलेल्या चांदीच्या वस्तूंमध्ये एक तांब्या आणि एका फुलपात्राचा समावेश असून, या भांड्यांचे एकूण वजन सुमारे अर्धा किलो असल्याचे सांगण्यात आले.

श्वान पथक, फॉरेन्सिक पथकाकडून पाहणी

आज सकाळी साडेसातच्या सुमारास शेजारील दुकानदाराच्या निदर्शनास अहिरे यांच्या घराच्या बाथरूमची खिडकी तुटलेली आली. त्याने तातडीने अहिरे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पीएसआय मोरे यांच्यासह श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.

बैल बाजाराच्या दिशेने चोरट्यांचे पलायन?

चोरी केल्यानंतर चोरट्यांनी घराचा मागील दरवाजा उघडून बैल बाजाराच्या दिशेने पलायन केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. श्वान पथकाने या दिशेने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस ठाण्याजवळच पोलिस अधिकाऱ्याच्या घरात चोरी झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT