धुळे

Illegal Business Protest Dhule : धुळ्यातील अवैध धंद्यांविरोधात ठाकरे गट आक्रमक; पंकज गोरे यांचे उपोषण

आंदोलनाच्या माध्यमातून निषेध, जनजागृती आणि पथनाट्याच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे

पुढारी वृत्तसेवा

धुळे : शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. सट्टा-मटका, जुगार, अवैध दारू विक्री, गांजा, गुटखा यांसारख्या बेकायदेशीर धंद्यांना आळा घालून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी युवासेनेचे राज्य सहसचिव अॅड. पंकज गोरे यांनी जेल रोडवर उपोषण सुरू केले आहे.

दरम्यान, या आंदोलनावरून शिवसेनेने महानगरपालिकेतील सत्ताधारी गटावरही निशाणा साधला आहे. अवैध धंद्यांच्या विरोधात आंदोलन सुरू झाल्याने त्याची आग यांना का लागली, असा टोला शिवसेनेने हाणला आहे. त्यांच्या सोबत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष शानाभाऊ कोळी, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगरप्रमुख धीरज पाटील तसेच तेजस गोटे, प्रशांत भदाणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

अवैध धंद्यांमुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढत असून, त्याचा परिणाम शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर होत असल्याचा आरोप अॅड. गोरे यांनी केला आहे. यापूर्वीही प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांकडे निवेदने देऊन कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र, अपेक्षित कारवाई होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, छोट्या टपऱ्या आणि लोटगाड्यांच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कष्टकरी व्यावसायिकांवर होणाऱ्या सरसकट कारवाईलाही त्यांनी विरोध केला आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यास नियमानुसार कारवाई करावी; मात्र रोजगाराचे पर्यायी साधन उपलब्ध न करून देता हजारो तरुणांना बेरोजगार करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

जप्त करण्यात आलेले साहित्य दंड न आकारता परत करण्याची मागणीही करण्यात आली आहे. अॅड. पंकज गोरे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, पोलीस महासंचालक, वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांसह संबंधित न्यायालयीन अधिकाऱ्यांना निवेदन पाठवून अवैध धंद्यांवर ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे. आंदोलनाच्या माध्यमातून निषेध, जनजागृती आणि पथनाट्याच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

आगामी हिंदूंच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कष्टकरी छोट्या व्यावसायिकांचा रोजगार हिरावून घेणारी कारवाई थांबवावी आणि त्याचवेळी अवैध धंदे व गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अॅड. गोरे यांनी केली आहे. धुळे जिल्हा अवैध धंदे व गुन्हेगारीमुक्त करून शहर सुरक्षित करण्यासाठी नागरिकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

भाजपावर टीकास्त्र

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अवैध धंदे बंद करण्याच्या उद्देशाने आंदोलन सुरू केले आहे. त्याचा अतिक्रमण निर्मूलनाशी कोणताही संबंध नाही. मात्र, तरीही त्यांच्या बुडाला आग का लागली, असा प्रश्नही गोरे यांनी उपस्थित केला आहे. आता या आंदोलनामुळे भाजपा आणि ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप रंगण्यास सुरुवात झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT