धुळे

Dhule News : जेबापूर’ला एक हजार आदिवासी शेतकऱ्यांनी मिळून सुरु केली दाळ मिल

गणेश सोनवणे

पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्रात पहिल्यांदाच हजारो आदिवासी शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन स्वतःचा शेतीमाल स्वतःच प्रक्रिया करून थेट बाजारात विक्रीला नेण्याचे ठरवले असून त्यादृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले आहे. साक्री तालुक्यातील जेबापूर येथे एक हजार आदिवासी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकार तत्वावर  दाळ मिल सुरु केली आहे.

या मिलचे उद्घाटन पर्यावरण संवर्धक चैत्राम पवार यांच्या हस्ते करण्यात आले. साक्री तालुक्यातील पश्चिम पट्टयातील एक हजार सोळा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शबरीमाता आदिवासी शेतकरी वित्त विकास महामंडळ नाशिक येथून भात गिरणी व दाळ मिल उभारणीसाठी अर्थसाहाय्य घेतले. त्याच बरोबर हजार आदिवासी शेतकऱ्यांनी देखील कंपनी उभी राहावी यासाठी योगदान दिले. देशबंधू अॅग्रो रिसर्च सेंटर प्रोड्युसर कंपनीचे जेबापूर येथे बारीपाडा येथील पर्यावरण संवर्धक चैत्राम पवार यांच्या हस्ते मशिनरीची पुजा करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी शेतकरी बांधव उपस्थित होते. तसेच यावेळी नवीन कार्यकारिणीची निवडदेखील करण्यात आली.

परिसरातील तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व कंपनीचे हित लक्षात घेता पुन्हा चैत्राम पवार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर विश्वास सूर्यवंशी उपाध्यक्ष, तर संभाजी काकुस्ते यांची सचिवपदी म्हणून निवड करण्यात आली. संचालक म्हणून रावजी चौरे, रतन भोये, जस्वांत बारीस, उत्तम चूरे, वंदना ठाकरे, उत्तम देशमुख, रमेश चौधरी, गोरख भोये यांची नावे यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ.मनीष सूर्यवंशी यांनी जाहीर केले.

कंपनीचे मुख्याधिकारी अनिल राठोड यांनी अहवाल वाचन करून आभार मानले. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT