धुळे : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथे विविध देशांतील तसेच महाराष्ट्रातील काही पर्यटक व नागरिक अडकले असण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या धुळे जिल्ह्यातील नागरिकांची माहिती तातडीने प्रशासनाला उपलब्ध व्हावी आणि त्यांना आवश्यक ती मदत पोहोचविण्यासाठी समन्वय साधता यावा, यासाठी संबंधित नागरिकांच्या कुटुंबीयांनी त्यांची सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन लिंकवर नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष भाग्यश्री विसपुते यांनी केले आहे.
नेपाळमधील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिक व पर्यटकांची माहिती संकलित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मंत्रालय, मुंबई यांच्यामार्फत स्वतंत्र ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अडकलेल्या व्यक्तींची माहिती प्राप्त झाल्यानंतर आवश्यक मदत व पुढील कार्यवाहीसाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधणे सुलभ होणार आहे.
माहिती नोंदविण्यासाठी लिंक :
https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/
धुळे जिल्ह्यातील कोणताही नागरिक किंवा पर्यटक नेपाळमध्ये अडकला असल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्य अथवा नातेवाईकांनी वरील लिंकवर जाऊन संबंधित व्यक्तीची आवश्यक व सविस्तर माहिती तातडीने नोंदवावी. माहिती अचूक भरल्यास संबंधित व्यक्तीपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी आवश्यक समन्वय अधिक प्रभावीपणे करता येईल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अथवा मदतीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे संपर्क साधता येईल.
जिल्हा नियंत्रण कक्ष संपर्क :
दूरध्वनी : 02562-288066
मोबाईल : 8698862890
नेपाळमध्ये अडकलेल्या धुळे जिल्ह्यातील नागरिकांविषयी माहिती असलेल्या नागरिकांनीही ती तातडीने प्रशासनापर्यंत पोहोचवावी आणि संबंधित कुटुंबीयांनी ऑनलाइन माहिती नोंदविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांनी केले आहे.